‘यशोधन’तर्फे शैक्षणिक दाखल्यांसाठी सुविधा उपलब्ध
जूनमध्ये सुरु होणार्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी १० वी आणि १२ वी नंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी सेतूमधून आवश्यक असलेली विविध कागदपत्र पूर्तता करण्याच्या मदतीसाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयामार्फत सुविधा उपलब्ध करुन दिली आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ आणि अनिल सोमनी यांनी दिली.
राज्याचे माजी शिक्षण व महसूलमंत्री, आ. थोरात यांनी महसूलमंत्री पदाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळोतच सर्व दाखले देण्याची ऐतिहासिक योजना राबविली होती. या अंतर्गत सुमारे ८० लाख दाखल्यांचे वितरण झाले. त्यामुळे या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवीन वर्षांतील प्रवेशासाठी आवश्यक विविध कागदपत्र सहज व लवकर मिळावी, यासाठी १ एप्रिल २०१७ पासून ‘यशोधन’मधील जनसेवकांमार्फत विद्यार्थी आणि पालकांना मदत केली जाणार आहे. १२ वीची परिक्षा नुकतीच संपली असून दहावीची परिक्षाही काही दिवसांत संपणार आहे. या परिक्षांच्या निकालानंतर नवीन शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते.
विविध प्रकारची दाखले देण्यासाठी सेतू कार्यालयात ४ खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार गरज भासल्यास सध्या असलेल्या कर्मचार्यांपेक्षा आणखी कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची तयारी असल्याची माहिती सेतू कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. पुढील शैक्षणिक वर्षात प्रेवश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर दाखला, रहिवासी (डोमेसाईल) दाखला, जातीचा दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदींसह विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. हे सर्व प्रकारचे दाखले सेतू कार्यालयात मिळत असून, विद्यार्थ्यांना दाखले वेळेवर मिळावेत, यासाठी ‘यशोधन’ कार्यालयातील जनसेवक मदत करणार आहेत. यामध्ये घुलेवाडी गट- विशाल काळे, धांदरफळ गट- मारुती कोल्हे, समनापूर गट - केशव फड, वडगांव पान गट - कैलास मोकळ, तळेगांव गण- बाळासाहेब गायकवाड, साकुर गट - अविनाश आव्हाड, आंभोरे गण - संजय केदार, बोटा गट - बबन खेमनर, आंबी खालसा गण- भाऊसाहेब गाडेकर, संगमनेर खुर्द गट -बाळकृष्ण गांडाळ, जोर्वे व आश्वी गट संजय वर्पे हे काम पाहणार आहेत.