शिर्डीत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई : मुख्याधिकारी दिघे
शहरात विनापरवाना लावले जात असणारे झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ अन्वये हा गंभीर गुन्हा आहे. न्यायालयानेदेखील यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय याकडे लक्ष ठेऊन त्याबाबतचा आढावादेखील घेत असते. या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली आहे. या नियमाचे उलंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा आदेश शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिले आहेत.
शहरातील विविध मंडळे, राजकीय पक्षांचे प्रमुख, लहान मोठ्या संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आली आहेत. या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे या पत्रात सूचित करण्यात आले आहे. शहरात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात. विविध ठिकाणचे रस्ते, सार्वजनिक जागा यांचे परस्पररित्या नामकरण केले जाते. कायद्याने हा सर्व प्रकार नियमाचे उलंघन करणारा आहे. शिर्डी शहरातील काही पदाधिकारी महत्वाची जबाबदारी पार पडत असतांना काही पदाधिकारी यांच्याकडून केलेल्या कृतीमुळे चुकीचा संदेश जातो. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. न्यायालयाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी या पुढच्या काळात कुठल्याही पक्षाने अथवा मंडळाने विना परवाना झेंडे, पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्ज, फोटो लावू नये, सार्वजनिक मालमत्तेचे रस्त्याचे किंवा चौकाचे नामकरण करू नये. अन्यथा संबंधितांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई येईल.
