Breaking News

अविश्‍वास प्रस्तावासाठी काँग्रेसकडून संसदेत अर्ज


नवी दिल्ली : काँग्रेसने भाजप सरकारविरूद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा सचिवांना अविश्‍वास प्रस्ताव सादर करण्याच्या संदर्भातील पत्र पाठवले आहे. संसदीय कामकाजाच्या नियमानुसार, मंत्रिमंडळाच्या विरोधात 27 मार्चला अविश्‍वास प्रस्ताव मांडण्यात यावा, अशा आशयाचे पत्र खरगे यांच्यातर्फे सादर करण्यात आले आहे. यापूर्वी आजच वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार वाय. व्ही. सुब्बरेड्डी यांनीदेखील याच कारणाची सूचना दाखल केली आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज 27 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तेलुगु देसम (टीडीपी) पक्षातर्फे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे, तर काँग्रेसने अनुसूचित जाती, जमाती कायद्यातील त्वरित अटकेची तरतूद काढून टाकण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकारने याचिका दाखल करावी, अशी मागणी लावून धरली आहे. 
दरम्यान, सरकारमधून बाहेर पडलेल्या टीडीपीकडे एकूण 16 खासदार आहेत, तर वायएसआर काँग्रेसकडे 9 खासदार आहेत. 34 खासदार संख्या असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही ठरावाला समर्थन दिले आहे. म्हणजे ठराव मांडण्यासाठी लागणार्‍या 54 खासदारांची संख्या पूर्ण झाली आहे. काँग्रेसही सोबत आल्यास या ठरावाला आणखी बळ मिळेल. शिवसेनेनेही अविश्‍वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी हे दोन्ही पख पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काही पक्ष सोडल्यास, बहुतेक सगळ्याच विरोधी पक्षांनी या ठरावाला समर्थन घोषित केले आहे.