Breaking News

विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद स्वप्न साकार करणारा


प्रवरानगर  - ‘प्रवरे’मधून शिक्षण घेऊन अनेक मुले जगाच्या कानाकोपऱ्यात काम करीत आहेत. तांत्रिक शिक्षण घेत असतानाच आपल्या सुप्त ज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या फायद्याचे यंत्र बनविणारे विद्यार्थी आणि अशा यंत्राची राज्यपातळीवर घेतली जाणारी दखल हे अभिमानास्पद आहे. प्रवरेत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद या गोष्टी पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यामागची दूरदृष्टी आणि स्वप्न साकार करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी पॉलिटेक्निकच्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि दिशा कॉम्प्युटरचे संचालक शरद काळे, संजय टेमक, ठाणे येथील प्रणव इंजिनिअरिंगचे कार्यकारी संचालक भास्कर नळे, सध्या अमेरिका येथे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी प्रणव महाजन, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे, प्रा. आर. बी निंबाळकर, प्रा लवांडे आदी उपस्थित होते. 

प्रारंभी प्राचार्य मनोज परजणे यांनी प्रास्तविक केले. उपप्राचार्य एन. एस. गरड यांनी वार्षिक उपक्रमांची माहिती दिली. निलेश बांदेकर, मयूर बोठे, अक्षय इनामके, भक्ती लुक्कड, शीतल गायकवाड यांच्यासह शैक्षणिक, क्रिडा आणि विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल महाडिक यांनी क्रिडा तर अश्विन आहेर याने शैक्षणिक बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. 

यावेळी बोलताना अरविंद पारगावकर म्हणाले, विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मिनी ट्रॅक्टर ड्रॉन चेक बेसीन फॉर्मर या प्रकल्पास राज्य पातळीवर प्रथम बक्षीस मिळविल्याबद्दल हे सारे अभिनंदनास पात्र आहेत. शिक्षणाच्या परिपूर्ण आणि अद्यावत सुविधा असलेल्या प्रवरेतून डिप्लोमा पूर्ण करून बाहेर पडणारे विद्याथीं हे परिपूर्णच असतात. शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी मनाची तयारी करून बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात सातत्य ठेवावी. यावेळी शरद काळे, भास्कर नळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. रविंद्र काकडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रिडासमन्वयक प्रा. ए. आर. अनाप, गायत्री खर्डे, हर्षदा रांजवणे यांचेसह विभाग प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. उपप्राचार्य एस. बी. लव्हाटे यांनी आभार मानले.