वयोवृध्द कलावतांना मानधन वाढवून द्या : आ. डॉ. तांबे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. डॉ. तांबे यांनी ही मागणी केली. राज्यातील वयोवृध्द कलावंतांना परावलंबी जीवन जगावे लागते. त्यांना १ हजार ५०० रुपये प्रतिमहा इतके तुटपुंजे मानधन मिळते. तेही वेळेत मिळत नाही. त्यांना मानधनासाठी प्रतिक्षा करावी लागते. हे मानधन किमान ५ हजार रु. प्रतिमहा करावे व ते वेळेवर मिळावे. या मागणीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक विचार करील, असे आश्वासन सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात उत्तर देतांना सांगितले. दरम्यान, अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. केंद्रशासनाकडून राज्याला प्राप्त झालेल्या शिष्यवृत्ती निधीपैकी बहुतांशी निधी वापरला जात नाही. शिष्यवृत्तीसाठी बँकेत खाते उघडण्यास त्रास होतो. त्यामुळे ‘झिरो’ बॅलन्स खाते उघडण्यास शासनाने बँकांना निर्देश द्यावेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी तसेच सध्याची शिष्यवृत्ती ही खूपच कमी आहे. त्यात भरीव वाढ व्हावी. अशीही मागणी आ. डॉ. तांबे यांनी केली.