Breaking News

कोळपेवाडीत महेश्वर यात्रोत्सवास प्रारंभ

कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्य दैवत महेश्वर महाराज यात्रोत्सवास मराठी नववर्षाच्या चैत्रशुध्द प्रतिपदेस {गुढीपाडवा} होत आहे. महेश्वराला गोदावरीच्या पवित्र जलाने अभिषेक घालुन या यात्रेला प्रारंभ होत आहे. यानिमित्त भाविकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी कोळपेवाडीनगरी सज्ज झाली असून मंदीर व बाजारतळ परिसर विद्युत रोषणाईने लखलखीत झाला आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदीर परिसर व बाजारतळ परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ‘वॉच’ असणार आहे. कोळपेवाडी हे व्यापारी व बाजारपेठेचे गाव असल्याने पंचक्रोशीतील गावचा कोळपेवीडीत दैनंदिन संबध येतो. नवसाला पावणारा महेश्वर म्हसोबा महाराज अशी ख्याती सर्वदूर असल्याने भाविकांची संख्या लाखोच्या घरात जाते. यात्रेत १२ गाड्या आेढण्याचा कार्यक्रम प्रमुख आकर्षण असते. भाविकांनी भरलेल्या बारा गाड्या देवीचा भगत लक्ष्मीआईच्या मंदीरापर्यंत ओढून नेतो. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते. 

यात्रा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या कालावधीत गैरप्रकार करणारांची गय होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यात्रा कालावधीमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमेटीच्यावतीने करण्यात आले आहे.