सरपंच पदाचा राजीनामा न दिल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील मोहरी गावात उसळलेल्या राजकीय दंगलीत सात जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी 20 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहरीचे सरपंच युवराज बाबासाहेब हळनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान मोहरी गावाच्या शिवारात मोहरीचे सरपंच युवराज बाबासाहेब हळनोर यांना सरपंच पदाचा राजीनामा का दिला नाही, या कारणावरून रामदास शिवदास गोपाळघरे यांनी लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोंपीनी सरपंचाच्या इतर सहकार्यांना काठीने, दगडाने मारहाण करून जखमी केले. यावेळी झालेल्या मारहाणीत यूवराज हळनोर, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, संजय सुखदेव श्रीरामे, पार्वती सुखदेव श्रीरामे, राधा यूवराज हळनोर, राजेंद्र अभिमान गलांडे, बंडू श्रीपती बाबर हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्रिंबक बाबासाहेब हळनोर, नंदु दादाराव गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नाना बळीराम गोपालघरे, गोकुळ गोपाळघरे, रामदास शिवदास गोपाळघरे, शिवदास एकनाथ गोपाळघरे, रोहीत नवनाथ गोपाळघरे, गोरख गोपालघरे, भास्कर विश्वनाथ गोपाळघरे, राहूल गोरख गोपाळघरे, पप्पु गोरख गोपालघरे, बाळू भिमा ठोंबरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, गुड्डू भास्कर गोपालघरे ( सर्व रा मोहरी ता जामखेड) तसेच भाऊसाहेब नारायण जायभाय, संभाजी जायभाय, कांतीलाल जायभाय यांचा मुलगा, पंडीत जायभाय (सर्व राहणार जायभायवाडी ता जामखेड) या वीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणातील शिवदास एकनाथ गोपाळघरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, रामदास शिवदास गोपाळघरे या चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत. मोहरी गावात उसळलेल्या राजकीय दंगलींमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सध्या मोहरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
सरपंच पदाचा राजीनामा न दिल्याच्या कारणावरून मोहरी गावात उसळली राजकीय दंगल !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:59
Rating: 5