Breaking News

अग्रलेख - अचाट कर्तृत्वक्षमता म्हणजेच पंतगराव कदम


डॉ. पंतगराव कदम यांच्या जाण्याने एक दिलखुलास व्यक्तीमत्वाला देश मुकला आहे. पंतगराव कदम म्हणजे, एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेला तरूण 19 व्या वर्षी शिक्षण संस्थेची स्थापना करतो, ही तशी ऐतिहासिक घटना. 19 व्या वर्षी अनेकांना आपल्या रोजगांराची, शिक्षणांची भ्रांत असते, अशा काळात पंतगरावांनी भारती शिक्षण विद्यापीठांची रोवलली मुहूर्तमेढ त्यांच्या विलक्षण बुध्दीमत्तेची आणि दूरदृष्टीची साक्ष देते. 19 व्या वर्षी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवत, त्यांनी जसा शिक्षणक्षेत्राला आयाम दिला, तसाच त्यांनी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील वावर वाढवत, आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरांवर त्यांनी विविध क्षेत्रात लिलया प्रवेश करत, ते क्षेत्र आपल्या अचाट पराक्रमाने गाजवले. सहकार क्षेत्र असो की, वनक्षेत्र, की शिक्षणक्षेत्र सर्वच क्षेत्रांवर पंतगराव कदम यांनी आपल्या बुध्दीमत्तेची मोहोर उमटवली. राजकारणांच्या क्षेत्रात पंतगराव कदम यांनी पाऊल ठेवताच त्यांच्या कर्तत्वाला एक वेगळीच झळाळी मिळाली. माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला. पुण्यात आलो आणि जेथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली, दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना हमखास अशीच सुरुवात करीत. वास्तविक त्यांच्याकडून भाषणाची होणारी ही सुरूवात, तरूणांसाठी प्रेरणादायी असे. सोनसळसारख्या दुष्काळी व दुर्गम परिसरात पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात शिक्षणाची कोणतीही सोय नसतांना, पाच किलोमीटरची पायपीठ करत, त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले. रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली होती. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी 1985, 1990, 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा सहा वेळा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. 29 वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार होते. मात्र त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अपूर्णच राहीले. 2004 आणि 2009 साली त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. पण पतंगराव कधीही नाराज झाले नाहीत. जे पद त्यांना दिले त्या पदाचा पुरेपुर वापर करत त्यांनी आपल्या कामातून एक वेगळेपण निर्माण केले. 1999 च्या निवडणुकांच्या वेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी काँग्रेसमधील अनेक नेते पवारांसोबत गेले. मात्र, पतंगरावांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही. 2004 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधून पतंगराव कदम एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यावेळी विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि पतंगरावांचे स्वप्न भंगले. विलासरावांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही पतंगरावांना डावलून अशोक चव्हाणांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनवले. यावेळी त्यांच्याकडे वनखाते देण्यात आले. एरवी दुर्लक्षित असलेले वनखाते मिळाले त्याचाही फायदा सांगलीला करून दिला. देशातील सातवी वन अकादमी सुरू करण्यात त्यांचे प्रयत्न सत्कारणी लागले. शिक्षणासह सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. भारती सहकारी बँक, सोनहिरा सरकारी साखर काररखाना, सागरेश्‍वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा कुक्कुटपालन संघ, कृष्णा - येरळा सूतगिरणी यांसह पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे.