Breaking News

ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार 100 टक्के शिष्यवृत्ती

गडचिरोली - विमुक्त जाती , भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगास प्रवर्ग कल्याण (ओबीसी मंत्रालय) विभागाने 30 जानेवारीला काढलेल्या आदेशात विद्यार्थ्यांच्या खात्यात मंजूर झालेल्या 50 टक्के रक्कमेपैकी 30 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच स्टॅम्प पेपरवर हमीपत्राची मागणी केली होती. या दोन्ही मुद्यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यसरकारकडे विरोध नोंदविला होता. 

सोबतच अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वितरण करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे करण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार राज्य सरकारसह ओबीसी मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला असून विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागांच्या केंद्र व राज्य योजनामधील सन 2017 -18 या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क 100 टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेत त्यासंबधीचे शासन आदेश विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने 7 मार्च रोजी काढला आहे. या निर्णयामुळे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना आत्ता 100 टक्के शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.