Breaking News

गोपनीय माहिती चोरीला जात असेल तर खपवून घेणार नाही


नवी दिल्ली : फेसबुकवरील गोपनीय माहितीची चोरी होत असून, हा डाटा परस्पर इतर देशात विकण्याचे प्रकार समोर आल्यानंतर, फेसबुकवरील भारतीय व्यक्तींच्या व्यक्तीगत माहिती चोरी झाली असेल तर, आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. असा इशारा केंद्रिय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक डेटा चोरी व लीक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. कोटयावधी युजर्सचा डेटा चोरून आपल्या खासगी फायद्यासाठी विकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये भारतीय युजर्सचीही गोपनीय माहिती असल्याचे समजते जात आहे.

याप्रकरणी भाजपाकडून काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे. काँग्रेसने केंब्रिज ऍनालॅटिका कंपनीला ही गोपनीय माहिती विकल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या माहितीच्याआधारे ब्राझील, नायजेरिया, केनिया, आणि भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात आल्याचा दिंडोरा कंपनीकडून पिटला जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्ग यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, फेसबुकच्या माध्यमातून कोणत्याही भारतीय व्यक्तीची गोपनीय माहिती चोरीला गेली असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. देशाच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार तुम्हाला समन्स बजावण्याचे आणि सक्त कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.
सध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात 20 कोटीहून अधिक फेसबुक युजर्स आहेत. या सर्वांची माहिती, डेटा राजकारणासाठी देशाबाहेर फेसबुक मार्फत नेला जाण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. यामुळे भारताच्या निवडणुकाही प्रभावित होऊ शकतात. 2016 साली अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तसेच या डेटाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.