Breaking News

चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्यासाठी अरविंद सुर्यवंशी यांची खेळी

मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना अंधारात ठेवून साबांतील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याची मुंबई साबांचे अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांची कार्यशैली मध्य मुंबईच्या अपहार प्रकरणाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणात दोषी अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून अरविंद सुर्यवंशी यांनी वेगवेगळ्या खेळी करून वेळ काढण्याचा प्रयत्न केला. या खेळीमागे चंद्रकांत दादा पाटील यांची बदनामी करण्याचा हेतू असल्याची चर्चा साबां वर्तुळात आहे.


मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांच्या कार्यकाळात कंत्राटदारांना प्रस्तावित देयकापेक्षा अधिक रकमेची देयके अदा केल्याचे चौकशीत उघड झाले असून ही रक्कम चोवीस कोटी इतकी असून शासनाच्या कोट्यावधी रूपयांचा अपहार करण्यास जबाबदार असलेल्या अभियंत्यांसह जास्तीचे देयके लाटणार्‍या कंत्राटदारांवर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून या अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश शासनाने 6 फेब्रूवारी 2018 रोजी दिले होते. अवर सचिव गो.भ.शिंदे यांची स्वाक्षरी असलेल्या या आदेशपत्रात तपासणी करण्यात आलेल्या सतरा कामांपैकी काही कामे विनिर्देशाप्रमाणे करण्यात आली नसताना व काही कामांमधील काही बाबींची कामे झालेली नसताना देखील सदर कामांची पूर्ण देयके कंत्राटदारास अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. एकच निविदा प्राप्त झाली असताना देखील महाराष्ट्र साबां नियमावलीतील परिशिष्ट क 208 मधील टीप 2(ब) नुसार कंत्राटदाराशी वाटाघाटी न करता थेट कार्यारंभ आदेश कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत. या गंभीर बाबींकरीता सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी कर्मचारी तसेच संबंधित कामांशी निगडीत असलेल्या कंत्राटदारांविरूध्द गुन्हे दाखल करून फौजदारी कार्यवाही करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुसार या प्रकरणी ए.जे.पाटीलसह सर्व जबाबदार दोषींविरूध्द फौजदारी कार्यवाहीसाठी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची तात्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. असे स्पष्ट नमुद केले आहे. जा.क्र.1648 प्रमाणे मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात दाखल असलेल्या या आदेशपत्रावर मुख्य अभियंत्यांनी शेरा मारून अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना पुढील कार्यवाहीसाठी आदेशीत केले होते. जवळपास दीड महिना उलटून गेल्यानंतरही अरविंद सुर्यवंशी यांनी या शासन आदेशाकडे दुर्लक्ष करून स्वतःशासनापेक्षा मोठे असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंद सुर्यवंशी यांनी शासनाचा हा आदेश पायदळी तुडवित असताना वेगवेळ्या क्लृप्त्या वापरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवली. त्याचाच एक भाग म्हणून मध्य मुंबई साबां कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे पत्र मिळवले. दि.17 फेब्रूवारी 2018 रोजी घेतलेल्या या पत्रात या अपहारात सहभागी असलेल्या अभियंता अधिकारी कर्मचार्‍यांनी सदर अपहार झाल्याचे मान्य करून शासनाचे कोट्यावधीचे नुकसान भरपाई करून देण्याची तयारी दर्शवून फौजदारी कारवाई थांबविण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी दि. 18 फेब्रूवारी रोजी रात्री 11.30 वा. मध्य मुंबई साबांच्या वरळी विभागाच्या कार्यालयात बसून अरविंद सुर्यवंशी यांनी या विभागात सध्या कार्यरत अधिकार्‍यांसोबत डिलिंग केल्याचा आरोप एका लोकप्रतिनिधीने केला आहे. या घडामोडीवरून अरविंद सुर्यवंशी हे डबल ढोलकी प्रवृत्तीने हे प्रकरण हाताळीत असून चंद्रकांत दादा पाटील यांना जाणीवपूर्वक बदनाम करीत असल्याचा संशय साबां वर्तूळात व्यक्त केला जात आहे.