Breaking News

पाथर्डीच्या लहानग्यांनी वाजविला नाशिकमध्ये डंका


उपसंचालक क्रिडा, युवकसेवा कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ०५ मार्च रोजी नाशिक येथे पार पडलेल्या, 'चला खेळूया विभागीय स्पर्धा' २०१८ मध्ये पाथर्डी तालुका तायक्वाँदो अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत तब्बल ०७ सुवर्णपदके पटकावली. 

या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या पाथर्डी येथील प्राथमिक केंद्रशाळेचा आर्यन देवढे, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेची पायल असलकर, प्रणिता देवढे, लकी वाघमारे, समृद्धी पाथरकर, स्वामी समर्थ विद्या मंदिर या शाळेची जितेश्री डमाळे, एम्.एम्. निऱ्हाळी विद्यालयाची गायत्री पवार या विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी सुवर्णपदके पटकावली.

या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागीय महसूल आयुक्त माने यांच्या हस्ते झाले. नगर जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाचे क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्ववर खुरांगे, धुळे जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाचे चौधरी , तसेच नंदुरबार, जळगांव व नाशिक येथील क्रिडा मार्गदर्शक व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा नगर जिल्हा तायक्वाँदो सचिव संतोष बारगजे व पाथर्डी तालुका तायक्वाँदो सचिव शंकर जेधे यांच्या नियंत्रणाखाली पार पडल्या.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पंच म्हणून अंबादास साठे, गोरक्ष गालम, सुरेश वाघ, महेश मुरादे, महादेव मगर व इतर जिल्ह्यातील चार पंचांनी काम पाहिले. पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, डॉ.दिपक देशमुख, स्वामी समर्थ शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले, केंद्रप्रमुख सुखदेव पगारे, राजेंद्र जायभाये, ज्ञानेश्वर गायके, संदिप भागवत, देवेंद्र आंबेटकर, इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.