Breaking News

कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच महिलादिनाचे खरे सार्थक : कविता आव्हाड


पाथर्डी/श.प्रतिनिधी/- रोज समाजामध्ये हातावर पोट भरणाऱ्या महिलांची उपेक्षाच होत असते. संसाराचा गाडा हाकताना पतीसोबत रोजीरोटीचा संघर्ष हा त्यांच्या जीवनातील नित्याचाच भाग. या धकधकीच्या जीवनातही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. म्हणून कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच महिला दिनाचे खरे सार्थक होय असे वक्तव्य मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या कविता आव्हाड यांनी केले. 

येथील मैत्रेयी ग्रुपकडून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या पत्नींचा सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नंदा आव्हाड, हौसाबाई काळोखे, आशाबाई सोळसे, प्राची आव्हाड आदी उपस्थित होत्या.

मैत्रेयी ग्रुप कडून यावेळी पाथर्डी शहरातील माथाडी कामगारांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. तसेच मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फन्सी ड्रेस स्पर्धेसाठी पूनम बाचकर व मनीषा पालवे तर वकृत्व स्पर्धेसाठी अनिता कानडे व वनिता पालवे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. यावेळी विजेत्यांना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी काही सत्कारमूर्ती महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा ढाकणे, सुत्रसंचालन मेघा कोळेकर तर आभार प्रा. सीमा पाटील यांनी मानले.