Breaking News

‘सिंहगड’च्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू


सोलापूर - शेततळ्यात कोर्टी रपूर येथील सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शरद शशिधर राव (वय 21, दत्तनगर, इंदापूर, जि. पुणे) याचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेततळ्यातील त्याचा मृतदेह तब्बल 19 तासांनंतर सापडला.कॉलेजला सुट्टी असल्यामुळे शरद राव मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील 7 ते 8 मुलांसह भाळवणी येथील अशोक लाले यांच्या शेतामधील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. अशोक लाले यांचा मुलगा आदित्य आणि अन्य मुले मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकतात. अशोक लाले यांचे शेततळे भाळवणी-गार्डी रोडलगत असून हे शेततळे 100 बाय 100 चे लांब, रूंद असून त्याची खोली 45 फूट आहे . तळ्यात जवळ जवळ 40 फूट पाणी असून या शेततळ्यात दुपारी 2 च्या दरम्यान ही मुले पोहण्यासाठी गेली होती. परंतु शरद राव याला पोहायला येत नसल्यामुळे तो मोटारीला बांधलेल्या दोरीला धरून पोहत होता. इतर सर्व मुले तळ्यातील पाण्यामध्ये पोहत होती. शरद ही पाण्यात पोहत असतानाच दोरी बरोबर पाण्यात खाली गेल्यामुळे तो वर येऊच शकला नाही. पोहायचे झाल्यानंतर मुलांना शरदचा मोबाईल, कपडे काठावर ठेवलेले दिसले. मात्र शरद दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही सर्व हकीकत घरच्या लोकांना सांगितली. ही बातमी समजताच गावातील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेऊन शोधा शोध सुरू केली. परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. रात्री 2 वाजेपर्यंत व दुसर्या दिवशी पहाटेपासून मुलाचा शोध सुरू ठेवला तब्बल 19 तासानंतर अजनाळे येथील लोकांनी पाणबुडीच्या सहायाने मृतदेह शोधून काढला. मुलाचे आई -वडील व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.