Breaking News

कणकवली न.पं. निवडणुकीसाठी स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडी

सिंधुदुर्गनगर, दि. 19, मार्च - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासोबत राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीची घोषणा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत केली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा 18 मार्च रोजी करण्यात येणार आहे. स्वाभिमानच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 57 जणांचे, तर नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज आले आहेत. राष्ट्रवादीला या निवडणुकीत किती जागा देणार, याबाबतचा निर्णय 18 रोजीच एकत्रित जाहीर क रण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले. कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. 

सामंत व भोसले म्हणाले, राष्ट्रवादी व स्वाभिमानच्या वरिष्ठांची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही आघाडी शहराच्या विकासाच्यादृष्टीने काम करणार आहे. नारायण राणे जेथे असतील, तेथे विकास होतो, त्यामुळेच ही आघाडी करण्यात आली आहे.
स्वाभिमानच्या यापूर्वीच्या स्वबळाच्या घोषणेबाबत छेडले असता, सामंत म्हणाले, निवडणुकीत दिवसाला समिकरणे बदलत असतात. त्यामुळे स्वाभिमान व राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांच्या ‘रिलेशन’चा भागही या आघाडीत आहे. शिवसेनेची काही मंडळी या निवडणुकीत स्वाभिमानमध्ये येतील. भाजप व स्वाभिमानच्या युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. स्वाभिमानचे सर्व जागांवर उमेदवार निश्‍चित झाले आहेत. मात्र, भाजपसोबत आघाडी करायची की कसे, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.
रेगे व भोसले म्हणाले, आघाडी करण्याबाबत काँग्रेसकडून प्रस्ताव आला होता. मात्र, वरिष्ठस्तरावरून प्रतिसाद मिळालेला नाही. नारायण राणेंसोबत यापूर्वी राष्ट्रवादीने अनेक निवडणुका लढविल्याने कणकवली शहराच्या विकासाची दृष्टी ठेवून स्वाभिमानसोबत आघाडीचा निर्णय घेण्यात आला. राणेंकडून यादी आली, की ती जाहीर करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले.