Breaking News

औरंगाबाद शहरातील कचर्‍याच्या प्रश्‍नी पुन्हा एकदा बैठक घेणार - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 07, मार्च - औरंगाबाद शहरातील कचर्‍याच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासन औरंगाबाद महापालिकेला निधी उपलब्ध करुन देईल. सध्या कचरा टाकण्यासाठी तात्पुरत्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. मात्र भविष्यात कचर्‍याचे डंपिंग बंद करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचे विलगीकरण व विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभूमीचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
यासंदर्भात सदस्य अजित पवार व इम्तियाज जलिल यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद शहराचा कचरा गेली 20 ते25 वर्ष ज्या क्षेपणभूमीवर टाकला जाता होता त्याला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी 3 ते 4 जागा देखील पाहिल्या. मात्र स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून मुख्य सचिवांमार्फत प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये क्षेपणभूमीचे कॅपिंग करणे, बायोमायनिंगच्या माध्यमातून कचर्‍याची विल्हेवाट लावणे, निश्‍चित कालावधीत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रीया करणे असे राज्य शासनाच्यावतीने नमुद क रण्यात आले आहे.