Breaking News

अग्रलेख - पुतळा तोडफोडीचे राजकारण


त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तीनही राज्यातील निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर काही तासातच, त्रिपुरामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिन याच्यां पुतळयांची तोडफोड करण्यात आली. लेनिन यांच्या पुतळयानंतर संपूर्ण देशभरात पुतळयांची विटबंना करण्याची चढाओढच लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लेनिन यांच्या पुतळयाचे तोडफोड करण्यात आल्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळयाला काळे फासण्यात आले. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांची विटंबना करण्यात आली. वास्तविक या पुतळा तोडफोडीचे राजकारण देशाला नवे नाही. मात्र महामानवांच्या पुतळयांच्या विटंबना करण्याचे प्रकार आताच का घडले. पुणे महापालिकेसमोर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसविण्याचा घाट याच पार्श्‍वभूमीवर नेमका घातला जात आहे? या अनेक प्रश्‍नांचा धांडोळा घेतला असता, राजकारणातील जातीय समीकरणे, आणि मुख्य म्हणजेच विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटून जाती-पातींच, भाव-भावनांच राजकारण करण्याचा केविळवाणा प्रयत्न यातून दिसून येतो. आजमितीस देशभरात अराजकतेसारखी स्थितीचे वातावरण आहे. सामाजिक धुव्रीकरणांमुळे अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. गो-सुरक्षेच्या नावाखाली अनेकांना मारण्यात आले. तर ‘भारत माता की जय’ वरून रणकंदन उठविण्यात आले होते. त्यातच सत्ताधारी आमदार-खासदार आणि मंत्री मोहदयांची वादग्रस्त वक्तव्य या देशातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे होते. तरीही पक्षांने त्यांच्यावर कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला नाही. त्यामुळे या सर्व घटनांत सातत्याने वाढ होत अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरली. ही सर्व मुद्दे पुन्हा उकरून काढण्यात काय हशील आहे? असा सवाल निर्माण होत आहे. यामागचे खरे कारण म्हणजे, विकासाचे अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. जातीपातीच्या भिंतीतील दुरावा वाढत चालला असून, सामाजिक सलोखा बिघडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात लोकसभेच्या आणि अनेक विधानसभेच्या निवडणूकांसाठी साधारण एक वर्षांचा कालावधी उरला आहे. अशावेळी त्या त्या राज्यातील सरकारचे, केंद्रातील भाजप सरकारच्या कामकाजांचे मूल्यमापन करण्यास देशभरात सुरूवात झाली आहे. अशावेळी सरकारच्या कामकाजांचे मूल्यमापन करतांना या सरकारचे गुणदोष काढण्याची स्पर्धांच सुरू झाली आहे. देशाचा विकास भरकटत चालला आहे, अशी अनेकांकडून ओरड होत आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड मोठया प्रमाणावर होत आहे. टीकेची झोड उठत असतांना सरकारने आपल्या भूमिकेत बदल करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या समस्या आजही तश्याच असून, आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जाती जाती मध्ये समाजाची विभागणी होत असून, जातीय तेढ वाढ होत आहे. या देशातील सर्वसामान्य माणसांला आपण सुरक्षित असल्याचे वाटत नाही. त्यातच पुतळयांचे राजकारण सुरू झाल्यामुळे इथल्या समाजाला आपली अस्मिता दुखावली जात आहे, आपला स्वाभीमान असलेल्या दैवतांची विटबंना होत असल्यामुळे, हा समाज देखील पेटून उठण्याची चिन्हे आहेत. अशावेळेस सरकारी यत्रंणानी पुतळयाच्या राजकारणांत हस्तक्षेप करत पुतळयांची होणारी विटंबना रोखण्याची गरज आहे.