बालिकांचे शोषण करणारा नराधम अटकेत
अकोला, दि. 27, मार्च - चॉकलेटचे आमिष दाखवून 3 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी चंद्रकांत काशीनाथ जुनगडे याला जुने शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी जुनगडे याला 8 ते 10 वर्षांची मुलगी असून तिच्याच काही मैत्रिणी आरोपीच्या घरी खेळायला येत असत. त्यावेळी आरोपीही त्यांच्या खेळात रमत असल्याने त्याच्यावर कुणी संशय घेत नसे. आरोपी पीडित मुलींसोबत चिठ्ठ्यांचा खेळ खेळायचा. चिठ्ठीत ज्या मुलीचे नाव येत असत तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपी त्या मुलीला बेडरूममध्ये नेत असे. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीवर आरोपी लैंगिक अत्याचार करायचा. गेल्या 23 मार्च रोजी एक पीडित मुलगी अत्याचारानंतर घरी गेली. त्यानंतर पीडितेचे कपडे बदलत असताना तिच्या आईला संशय आला. याबाबत मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर सदर पीडितेच्या आईने शेजारील दोन मुलींच्या आईला याबाबत विचारणा केली असता त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार घडल्याची बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी तीनही पीडित मुलींच्या आईने जुने शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. याप्रकरणी आरोपी विरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी दिली.