शिंगणापूर येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात
सातारा, दि. 27, मार्च - शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसेच यानिमित्त मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत मोठ्या साहसाने ध्वज बांधण्याचा म्हणजेच मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री बारा वाजता महापूजा करुन विधिवत पद्धतीने शिव-पार्वती विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. गुलाबी रंगाची उधळण करित, ज्वारीच्या अक्षता टाकत, मंगल अष्टकांच्या साथीने भक्तिमय वातावरणात शिव-पार्वती विवाह संपन्न झाला. याप्रसंगी शाही ढोल नगारे यांचा निनाद करण्यात आला. हर हर महादेव या भाविकांच्या गर्जनेने अवघा महादेव डोंगर व परिसर दुमदुमला. या सोहळ्यास विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह संपूर्ण महाराष्ट्रातून वर्हाडी मंडळी आली होती. विवाह प्रसंगी जिराईतखाने, साळी, कोष्टी, कोळी, माळी, वाघमोडे यांचा मान असतो. लग्न विधिवत पध्दतीने पार पडल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत सर्व मानकरी बोहल्यावर रंग खेळण्याचा खेळ खेळतात. रंगाची उधळण करुन शिव-पार्वती लग्नोत्सव सोहळा कोळी समाजासह बडवे, जंगम, गडशी, गुरव, मानकरी, सेवाधारी व भक्त-भाविक यांनी साजरा केला. शंभू महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) या मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्याचा यावर्षीचा मान मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस जि.उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला मिळाला आहे. वाजत-गाजत मंदिर परिसरात ध्वज आणण्यात आला. ध्वज बांधण्यास सुरुवात करण्यात आली. ध्वज बांधताना त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.