सातारा, दि. 27, मार्च - नगरपंचायतीच्या सभेत राष्ट्रगीत सुरू असताना उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रगीताचा अवमान केला. त्यामुळे लोणंदच्या संस्कृ तीला काळीमा फासणा-या लक्ष्मण शेळके आणि नगरसेवकांच्या निंदनीय कृत्याची पाठराखण आमदार व भाजप जिल्हाध्यक्षांनी करू नये. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. स्नेहलता शेळके - पाटील म्हणाल्या, लोणंद नगरपंचायतीच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावरील चर्चा होत असताना सुरूवातीपासूनच लक्ष्मण शेळके, हणमंत शेळके, योगेश क्षीरसागर, किरण पवार, दिपाली क्षीरसागर, कुसूम शिरतोडे हे नगरसेवक प्रचंड गोंधळ घालत होते. विषय पत्रिकेवरील विषय चर्चेस न घेता इतर विषय वाढवत होते. असे होऊ नये म्हणून मी व मुख्याधिकारी वांरवार विनंती करीत होते. विषय पत्रिकेवरील विषय व पत्रव्यवहार संपल्यानंतर सर्व नगरसेवकांना शांत राहण्याची विनंती केली व मुख्याधिकारी व मी आपल्या जागेवर उभे राहिले. इतरही नगरसेवक उभे राहीले. हे सर्व लक्ष्मण शेळके व चार नगरसेवक पहात होते.राष्ट्रगीत म्हणण्यास नगरसेवकांनी सुरूवात केली. या दरम्यान लक्ष्मण शेळके यांनी मुख्याधिकारी यांना उद्देशून उपस्थित महिला नगरसेवकांना लज्जास्पद वाटेल अशा भाषेत शिवीगाळ केली. तसेच संपूर्ण सभागृहाला उद्देशून काही काळ शिवीगाळ सुरुच ठेवली. त्यांना राष्ट्रगीत सुरू आहे हे माहीत असतानाही ते न म्हणता त्यांनी ऑफीस अधीक्षक शंकर शेळके यांच्या दिशेने पिण्याच्या पाण्याची बाटली भिरकावली. मात्र, ती कोणास लागली नाही. यावेळी राष्ट्रगीत सुरूच होते. नगरसेवक हणमंत शेळके, किरण पवार, योगेश क्षीरसागर हेही राष्ट्रगीत सुरु असताना बाकावर हाताने जोरदार आदळ-आपट करत होते. राष्ट्रगीतानंतर मला व मुख्या धिकारी यांना तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. याचे परिणाम तुम्हाला दोन महिन्यात दिसतील अशी दमदाटी केली. याचे व्हीडीओ चित्रण झाले असून शिवीगाळ व राष्ट्रगीताचा अवमान क रणा-या लक्ष्मण शेळके व नगरसेवकांची योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दिली असून त्याच्या प्रती वरिष्ठ मंत्री व अधिका-यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.