Breaking News

ट्रॅक्टरच्या धडकेने विदयार्थीनीचा मृत्यु संतप्त ग्रामस्थांनी पेटवला ट्रॅक्टर


कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखाण्यानजिक भरधाव वेगाने येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान घडली.आकांक्षा संजय साबळे (वय:१७) असे या विद्यार्थीनीचे नाव असुन ती अंबिकानगर येथील कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या कला शाखेत शिकत होती.

महाविद्यालयातून घरी परतत असताना उसाने भरुन कारखान्याकडे येत असलेल्या ट्रॅक्टरने सायकलवरुन जात असलेल्या विद्यार्थीनीला जोराची धडक देऊन जखमी केले. तीला उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बोर्डाचा पेपर असल्याने अकरावीचा वर्ग सोडण्यात आला होता.महाविद्यालय सुटल्यानंतर सायकलवरून आपल्या बारडगाव सुद्रिक येथील घराकडे येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघात घडताच परिसरातील नागरिक जमा झाले. संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त ट्रॅक्टर पेटवून दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. 

घटनेची माहिती मिळताच राशीन पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक वैभव महांगरे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. कचरु मल्हारी साबळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास राशिन पोलिस करित आहेत. डबल ट्रेलर जोडुन उसाची वाहतूक केली जात असल्याने कर्जत तालुक्यात अपघात नित्याचे झाले आहेत. बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.