Breaking News

अग्रलेख - तिसर्‍या आघाडीची नांदी !

देशातील राजकारण आजमितीस एका वेगळया टप्प्यावर असून, 2019 मध्ये याच राजकारणांच्या बळावर देशात अनेक उलथापालथ होऊ शकते. प्रस्थापित पक्षांना धक्का देत प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींनी दिल्लीत वेग घेतला असून, कर्नाटक निवडणूकींचे निकाल हाती येताच विरोधक एकवटण्याची चिन्हे आहेत. कालच ममता बनर्जी व दिल्लीत दाखल झाल्या असून, त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यासह विविध प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांसोबत भेट घेत चर्चा करत तिसरी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीने अनेक राज्ये काबीज करण्याचा सपाटा लावला असला तरी, त्यांच्याविरोधात वाढत असलेला रोष ही विरोधकांसह काँगे्रसच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे येणार्‍या काळात तिसर्‍या आघाडीची मोट बांधून त्याचे नेतृत्व कुणाच्या हातात येणार आहे? हा प्रश्‍न पुढील काही महिन्यातच निकाली निघेल. मात्र तुर्तास तरी सर्वच प्रादेशिक पक्षांकडे शरद पवार यांच्यासारखे मुरब्बी आणि सर्वच प्रादेशिक पक्षांशी चांगले संबध असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे पवार सहजच तिसर्‍या आघाडीची मोट बांधू शकतात, असा कयास आहे. मात्र उत्तर आणि दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतील का? हाही एक प्रश्‍न समोर आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले असले, तरी त्यांनी यासाठी भाजपाचा प्रमुख विरोधक काँगे्रसला बाजूला ठेवण्याची मागणी विविध प्रादेशिक पक्षांना केली होती. अशातच पवार यांचा राजकारण हे काँगे्रसपासून सुरू होते. आणि पुढील राजकारण ही काँगे्रससोबतच राहणार आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा काँगे्रसला होणारा विरोध, पवार कसा मोडीत काढतात. आणि सर्वच प्रादेशिक पक्षांना घेऊन तिसर्‍या आघाडीचा सक्षम पर्याय देशासमोर ठेवतील का? हे 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी स्पष्ट होईलच. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणूकांना अजून अवकाश आहे. अशावेळेस तिसरी आघाडीची स्थापना जर लवकर झाली, तर देशभरात ते मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढून, राजकीय वातावरण निर्माण करू शकतात. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँगे्रसेत्तर प्रादेशिक पक्षाशी आघाडी उभारणे किंवा काँगे्रसच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणे असे दोन प्रवाह सध्याच्या राजकारणांत पहावयास मिळत आहे. त्यातच नेतृत्व कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बॅनर्जी यांनी प्रादेशिक पक्षाची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांनी प्रादेशिक पक्षाची संयुक्त आघाडी स्थापनेचे संकेत दिले होते. या प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत शिवसेना, उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष, बसपा यांच्यासह डीएमकेच्या नेत्या कनिमोळी, वायएसआर काँग्रेस आणि बीजू जनता दल, तेलगु देसम यासह विविध प्रादेशिक पक्ष कोणत्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच. प्रादेशिक पक्षांना आपला पक्ष आणि अस्मिता टिकविण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधणे अपरिहार्य आहे. भाजपची संसदेत कोंडी करण्यासाठी काँगे्रससह अनेक प्रादेशिक पक्षांनी अविश्‍वास ठरावाची नोटीस देखील दिली आहे. मात्र गोंधळामुळे हा अविश्‍वास ठरात संसदेच्या पटलावर आला नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची कोंडी होत असल्याचा समज दृढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.