Breaking News

दखल - बरं झालं अमितभाई तुम्हीच बोललात!

जे मनी असे, ते ओठी दिसे, असं म्हणतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अतिशय जबाबदार आहेत. त्यांची जिभ इतरांसारखी कधी घसरत नाही. ते तोलून मापून बोलणारे आणि खरं तेच सांगणारे. स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. इतरांसारखे ते उठवळ नाहीत. त्यामुळं कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय महत्त्त्वाचं आहे. 

इतरांच्या भ्रष्टाचारावर तुटून पडताना स्वकीयांनाही सोडायचं नाही, इतका प्रामाणिकपणा अलिकडच्या काळात कुठून पाहायला मिळणार? पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व भाजपच्या अध्यक्षपदी स्वत: अमितभाईंची निवड झाल्यानंतर अमितभाईंचा मुलगा जयेश शहा यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. त्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी अमितभाई व नरेंद्रभाई स्थितप्रज्ञासारखे राहिले. कारण जयेशभाईंची संपत्ती वाढ ही काही गैरव्यवहार नव्हता. तसं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचं नव्हतं. त्यांनी उघडउघड गैरव्यवहार केला होता. त्यावरून सुषमाजींची किती ससेहोलपट झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणखी एक स्वयंसेवक नापास झाला, म्हणून किती दु:ख झालं होतं. हे आता कुणाच्या लक्षात येणार नाही; परंतु मा. गो. वैद्यांनाच ते जास्त ठावूक असणार. भाजपशासित राज्यांतला कारभार किती स्वच्छ आहे, हे अमितभाई सांगत असतात; परंतु मोदी यांच्या काळात गुजरातमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आता सुरू झाली आहे, हे त्यांना माहीत नसावं. व्यापमं घोटाळ्यामुळं तर मध्य प्रदेशाचं नाव जगभर गेलं. तिकडं वसुंधराराजे यांनी ललितकुमार मोदी यांच्या पत्नीला सरकारी पद दिलं. याच ललितकुमार मोदी व वसुंधराराजे यांचा मुलगा दुष्यंतकुमार यांच्यातील भागीदारी सर्वश्रुत आहे. महाराष्ट्र सरकारला तर उंदीर कुरताडताहेत. एकनाथभाऊंना ते जास्त तपशीलानं माहीत आहे.
कर्नाटकमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. येदियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. काँगे्रसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप भाजप करत आहे. मात्र, अमितभाई पडले प्रामाणिक. त्यांनी निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. शाह म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की, भ्रष्टाचारासाठी कुठलं सरकार पात्र असेल, तर ते येदियुरप्पांचं सरकार. ते असं म्हणताक्षणीच शेजारी बसलेल्या व्यक्तीनं चूक निदर्शनास आणली. शाह यांनी लगेच चूक सुधारत सिद्धरामय्या सरकार अशी दुरूस्ती केली. अर्थात अगोदर बोललं, तेच खरं असतं. नंतरच्या सारवासारवीला अर्थ नसतो. अमितभाईंच्या अशा वक्तव्याचा फायदा न उठवतील, तर ते सिद्धरामय्या कसले? त्यांनी लगेच ट्वीट केलं. त्यांनी शहा यांचे आभार मानले आहेत. तुम्ही अखेर सत्य वदलात, असं उद्गार सिद्धरामय्या यांनी काढले आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँगे्रेसच्या हातात असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटक असून ते जिंकण्यासाठी भाजप जीवाची बाजी लावणार असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत आज घडल्या, तशा प्रत्येक चुका उचलून धरण्यास काँग्रेस उत्सुक असेल हे ही दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांनी 24 दिवस तुरुंगाची हवा खाल्ली आहे. बी. एस. येदियुरप्पा हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी असताना राज्यात बेकायदा खाण उद्योग बोकाळला होता. कर्नाटकात अधिकृत खाण उद्योग चालवून सरकारच्या तिजोरीत भर घालण्यापेक्षा अनधिकृत खाण उद्योग चालवून झटपट श्रीमंत होण्याचा आणि जास्तीत जास्त पैसा ओरबाडण्याचा उद्योग येदियुरप्पांनी चालवला होता. त्यामुळे सरकारी तिजोरीला तब्बल 16 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. त्याचबरोबर भूखंडाचे श्रीखंड खाण्याचाही सपाटा येदियुरप्पांनी लावला होता. त्यांच्याच कौटुंबिक ट्रस्टला हेच खाणमालक कोट्यवधींच्या देणग्या देत होते. अशा प्रकारे पाचही बोटं भ्रष्टाचारात बरबटलेल्या येदियुरप्पांच्या विरोधात कर्नाटकच्या लोकायुक्तांचा अहवाल येऊनही त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपवर त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली होती. आता जसं अण्णांचं दिल्लीत आंदोलन चालू आहे, तसंच आंदोलन त्या वेळी ही चालू होतं. संयुक्त पुरोगामी आघाडीतील भ्रष्ट मंत्र्यांना पायउतार व्हावं लागल्यानं येदियुरप्पा यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्यालाही पायउतार करावं लागलं होतं. त्यावेळी नितीन गडकरी यांच्यावर स्वैर आरोप करत येदियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली केली आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे अस्तित्व दिसणार नाही, अशी धमकीही दिली. त्यांनी लगेचच कर्नाटक जनता पक्ष नावाच्या पक्षाची स्थापना करून भाजपच्या विरोधात निवडणूकही लढवली. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ 6 जागा व 10 टक्के मते मिळाली. त्यांना हक्काच्या लिंगायत आणि वोक्कलिंग मतदारांनीही माफ केलं नाही.
सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनाच मतांच्या राजकारणासाठी भाजपनं जवळ केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. येदियुरप्पा हे कर्नाटकातील एक संस्थान होते. ते पक्षातून बाहेर पडले असले, तरी त्यांनी मोदींची स्तुती केली होती. मोदींनाही दक्षिण दिग्विजय करणार्‍या सरदाराची गरज होती. आपला सरदार एकनिष्ठ व अंकित राहील, याची खात्री त्यांनी करून घेतली. येदियुरप्पा सत्तेवर असताना त्यांच्या भ्रष्टाचाराच्या 25 हजार पानांच्या सुरस कथा तत्कालीन लोकायुक्त संतोष हेगडे यांनी आपल्या अहवालात नमूद केल्या होत्या. हा भ्रष्टाचार मोदींनी माफ केला; परंतु अमितभाईंच्या तोंडून नकळत का होईना सत्य बाहेर आलं.