Breaking News

जळगाव - औरंगाबाद मार्गावर ‘शिवशाही’ सुरू

जळगाव  - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या शिवशाही बस सेवेचा आजपासून जळगाव ते औरंगाबाद दरम्यान शुभारंभ झाला. या सेवेच्या निमित्ताने जिल्ह्यातील परिवर्तन सेवेच्या एकूण सात फे-या रद्द करून त्या ठिकाणी शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.


नाशिक व धुळे मार्गावरही लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून परिवर्तन सेवेला शिवशाहीद्वारे ‘ओव्हरटेक’ करीत उत्पन्न वाढीचा प्रयत्न महामंडळाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव येथून यापूर्वी पुणेपर्यंत शिवशाही बससेवेची एक फेरी दररोज सुरू आहे. त्यात आता औरंगाबाद मार्गावरही ही सेवा सुरू करण्यात आली असून 5 मार्च रोजी या सेवेचा शुभारंभ झाला. पहाटे सव्वा पाच वाजता पहिल्या फेरीच्या वेळी एका प्रवाशांच्याहस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. या वेळी आगार प्रमुख पी.एस. बोरसे, स्थानक प्रमुख नीलिमा बागूल उपस्थित होते. पहिल्या दिवशी शिवशाहीच्या पहिल्या फेरीतून 9500 रुपये उत्पन्न मिळाले. औरंगाबाद मार्गावरील प्रमुख थांब्यावरही या बसचा थांबा असून पहिल्या दिवशी किती प्रवासी संख्या होती, ते संध्याकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकले नव्हते. मात्र अपेक्षित उत्पन्नाच्या निम्मेही हे उत्पन्न नसल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. परिवर्तन बसने औरंगाबादचे भाडे 178 रुपये आहे तर शिवशाहीने 273 रुपये भाडे आकारले जात आहे. ही बस वातानुकुलीत, पुशबॅक सीट व वायफाय सुविधा असलेली असून उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना याद्वारे आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादसाठी जळगाव येथून सकाळी 5.15, 7.15 व 9 अशा तीन वेळेस ही बससेवा आहे. तर भुसावळ (व्हाया जामनेर) येथून सकाळी 5.30, 6.45, 7.25 अशा वेळा आहेत.