Breaking News

राळेगणसिध्दीत मोदी व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


केंद्र शासनाने प्रलंबित विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीला रामलीला मैदानावर आजपासुन सुरु केलेल्या आंदोलनास जाहीर पाठींबा म्हणून राळेगण सिध्दी परिवाराने सरकारचा निषेध करून मोदी व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यादव बाबा मंदीरासमोर दहन करण्यात आले. राळेगणसिध्दी परिवार, ग्रामस्थांच्यावतीने उपोषणास पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. अण्णा हजारे यांनी जनलोकपाल व शेतकरी यांच्या विविध मागण्यासंदर्भात कालपासुन रामलीला मैदान दिल्ली येथे आंदोलन सुरु केले आहे. अण्णांच्या या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, शिरुर, श्रीगोंदा तसेच तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील महिला, युवक, युवती ऱाळेगणमध्ये दाखल होत आहेत. आंदोलनास पाठिंबा जाहीर करत आहेत. सकाळी 10 वाजता राळेगण परिवारातील सर्व ग्रामस्थ महिला, युवक, विद्यार्थी, संत यादवबाबा मंदीरा समोर एकत्र येवून त्यानंतर पदमावती परिसरातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला ग्रामस्तांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन, संत यादवबाबा मंदीरासमोरील ओट्यावर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातून युवक, युवती, महीला, सामाजिक कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला निघाले असताना मुबई, पुणे विभागातील रेल्वे प्रशासनने रद्द केल्याने सरकारच्या या आडमुठे धोरणाचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे जिंदाबाद, भारत माता की जय, जय जवान जय किसानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी पुतळा दहन करताना उपसरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, रोहीदास पठारे, सुभाष पठारे, कांतीलाल औटी, नाना लंके, गणपत पठारे, त्रिंबक गाजरे, अरुण भालेकर, दत्तात्रय मापारी, निवृत्ती मापारी, भिमराव पोटे, माधवराव पोटे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.