Breaking News

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा

बीड, (प्रतिनिधी):- मराठा समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडे केली. सकाळी 11 वाजता बीड येथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे झालेल्या जनसुनावणीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा एकमुखी सूर अनेकांनी व्यक्त केला.

बीड येथे काल सकाळी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे मराठा आरक्षण जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दल सदस्यांपुढे मत व्यक्त केले. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे पुरावे आकड्यांसह सदस्यांपुढे मांडण्यात आले. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचा एकमुखी सूर या जनसुनावणीत उमटला. मराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीने ओबीसी प्रवर्गामधून काही ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही यावेळी नमुद करण्यात आले. शिवसंग्रामच्यावतीने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा अशा मागणीचे निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले. काल दुपारपर्यंत विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मराठा आरक्षणाशी संबंधित निवेदने आणि त्यासोबत पुरावेही राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे मांडले. मराठा क्लबच्यावतीने अशोक सुखवसे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन देवून मराठा समाजाचा सर्वांगीण मागासलेपणाच्या आधारे इतर मागासवर्गात समावेश करावा अशी मागणी केली आहे.
जमिअत उलेमा हिंदच्या वतीने मराठा समाजाच्या सर्वांगीण मागासलेपणाच्या आधारे या समाजाला आरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन बीड शाखेच्यावतीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आले. मराठा समाजाचे 90 टक्क्यापेक्षा अधिक लोक परंपरेने शारिरीक श्रमाचे काम करुन स्वत:चा उदरनिर्वाह करतात. बहुतांश समाज ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास असुन मराठा समाजाला आरक्षण देवून त्यांना सामाजिक प्रवाहात आणावे अशी मागणी जमिअतच्यावतीने करण्यात आली. निवेदनावर हाफेज महंमद जाकेर, मोईन मास्टर, फारुख पटेल, अ‍ॅड.शेख शफिक, मुफ्ती अतिकुररहेमान कासमी, मौलाना अब्दुल बाकी, काझी शफिक, शाहेद पटेल, मौलाना इलियास खान, शेख महंमद रफिक, हाफिक जुनेद, हाजी नसीम इनामदार, खुर्शीद आलम, खदीरभाई ज्वारीवाले आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.