कुळधरणचे प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्पर सेवा!
कर्जत तालुक्यातील कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाप्रमाणे सर्व निकष पूर्ण करत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प’ पुरस्कार संपादन केला. यामध्ये राज्य शासनाचे २ लाख रुपयांचे बक्षीस या प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रांविषयी जनतेचे मत चांगले नसतांना या केंद्रात रुग्नांना तत्पर सेवा मिळत आहे.
ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार वाढत चाललेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने ही केंद्र कात टाकू लागली आहेत. विविध नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांमुळे आरोग्यकेंद्रांचे रूप पालटण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून होत आहे. कुळधरणच्या या आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच या कामात सातत्य रहावे यासाठी शासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु केलेली आहे. त्यात कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवत सेवेतून दर्जा सिद्ध केला आहे. कुळधरण केंद्राने गेल्या वर्षीही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले होते. विनम्र, तत्पर व समाधानकारक आरोग्य सेवा ही कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख बनली आहे.