औद्योगिक वसाहतीसाठी १ कोटीच्या रोहित्राचे लोकार्पण
कोपरगांव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसाठी अखंडित वीज मिळावी, यासाठी ८२ लाख ५८ हजार रूपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले १० एमव्हीए वीज रोहित्र येथे बसविण्यात आले. आ. स्नेहलता कोल्हे आणि व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते या रोहित्राचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई होते.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी {दि. २४} हे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलतांना बिपीन कोल्हे म्हणाले की, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारसंघातील दैनंदिन व शेतीच्या वापराचा वीज प्रश्न सोडविण्यांसाठी कोटयावधी रूपयांचा निधी दिला आहे. ७ वीज उपकेंद्र, २२० केव्हीए उपकेंद्र, १२० केव्हीए उपकेंद्र असे ग्रामीण भागासाठी १८६ तर शहरासाठी ३६ वीज रोहित्र दिले. शहरातील भूमिगत वीज वाहिनींसाठीह ४५ कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील उद्योजकांचे अन्य राज्यात स्थलांतर होऊ नये, यासाठी वीजेचे दर कमी करावे म्हणून केंद्र व राज्यातील मंत्रीमहोदयांकडे मागणी केली आहे. आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की कोपरगांव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत विकासासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रूपयांची मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच निधी मिळेल. औद्योगिक वसाहत परिसरात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. पंडीत भारूड संपादित माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या जीवनकार्यावरील चलचित्रफितीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे संचालक केशव भवर, पराग संधान, अनिल सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, हाशम पटेल आदींच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी वीज वितरण कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांनी प्रास्तविक केले. यावेळी अनिल सोनवणे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांची भाषणे झाली. अधिक्षक अभियंता बजरंग खंदारे, सहायक अभियंता पांडे आदींसह औद्योगिक वसाहतीतील उ़द्योजक याप्रसंगी उपस्थित होते. हायटेक इंडस्ट्रीजचे महेष खडामकर यांनी वृक्षारोपणांसाठी पंधरा लोखंडी जाळया दिल्या त्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक अभियंता दिगंबर वर्पे यांनी केले. संचालक पंडीत भारूड यांनी आभार मानले.