महिला नगरसेवकांनी केली पंकजा मुंडेंशी विविध प्रश्नांवर चर्चा
यावेळी आ. कोल्हे यांनी कोपरगाव शहर नगरपालिकेत विविध विकास कामांसाठी युती शासनाकडून कुठल्या कामांसाठी किती आणि कसा निधी मिळाला, याबाबतची माहिती दिली. महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आणखी कुठल्या योजना असतात आणि त्या राबवितांना येणा-या अडचणीबाबत महिला नगरसेविकांनी यावेळी चर्चा केली. महिला बालकल्याण विभागाच्या सभापती दिपा गिरमे यांनी कोपरगांव शहरात नगरपालिकेमार्फत राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. प्रारंभी भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा योगिता होन व शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे यांनी परिचय करून दिला.
याप्रसंगी नगरसेविका विद्या सोनवणे, ताराबाई जपे, मंगला आढाव, विजया देवकर, भारती वायखिंडे, निलोफर पठाण, शहाजहां पठाण, ‘बेटी बचाव बेटी पढाव अभियान’च्या श्वेतांबरी राऊत, जिल्हा महिला भाजपाच्या नंदा भंडारी, शोभा थोरात आदी उपस्थित होत्या.
युती शासनाने महिलांसाठी अल्पखर्चात ‘सॅनिटरी पॅड अस्मित योजना राबवून महिलांसह विद्यार्थिनींना दिलासा दिला. त्याबददल मंत्री पंकजा मुंडे यांचा नगरपालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या सर्व महिला नगरसेवकांनी अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज कसे चालते, याबाबतची माहिती जाणून घेतली. महिलांनी महिलांच्या प्रश्नांत जागरूक राहून प्राधान्यांने काम करावे. महिला बचतगट चळवळ जोमाने पुढे नेत विकास साधावा, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. नगरसेविका विद्या सोनवणे यांनी आभार मानले.