Breaking News

विकासाला चालना देणारे आ.शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठाम रहा - यशराज देसाई

सातारा - आ.शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करीत आहेत. राज्यात युतीचे असणारे शासन या शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांना ते आणत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात गत अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. मागेल त्या गावाला विकासकाम मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असते.विकासाला चालना देणारे नेतृत्व आ.देसाई यांच्या रुपाने आपणा सर्वांना मिळाले आहे त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे, असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.निवडे पुर्नवसित गावठाण ता. पाटण येथील अंतर्गत रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. 
याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले की, पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचा सर्वागीण विकास साधला. त्यांच्या पश्‍चात अनेक वर्षे मतदारसंघातील विविध विकासकामे प्रलंबित राहिली. 2004 साली शंभूराज देसाई हे पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी आघाडीचे सरकार सत्तेत होते. विरोधी बाकावर बसून सुध्दा आ. देसाई यांनी त्या पाच वर्षात पाटण मतदारसंघात 217 कोटी रुपयांची विकासकामे शासनाकडून मंजूर करुन आणली. आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍नांच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक असे निर्णय करुन घेतले. सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून मतदारसंघातील जनता आ. देसाई यांच्याकडे पहात असून त्यांनीही सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला आहे. जनतेचा विकास कसा साधायचा त्याकरीता कोणत्या उपाययोजना राबवायच्या याची इत्ंभूत माहिती असणारे आपले सर्वांचे लाडके आ. देसाई हे कर्तव्यनिष्ट लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना लाभले आहेत त्यांचे हात बळकट करणे आपल्या सर्वांचे काम असून ते काम आपण सर्वांनी करुया असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत बबनराव शिंदे यांनी करुन उपस्थिंतांचे आभार मानले.