Breaking News

‘प्रवरा’च्या कारमुळे आंतरराष्ट्रीय संघटना समाधानी : डॉ. खर्डे


प्रवरानगर प्रतिनिधी - नवीन तंत्रज्ञानांचा अविष्कार शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, यादृष्टीने विविध कौशल्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरम्यान, SAE-BAJA या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारच्या निर्मितीबाबत सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअर्स या आंतरराष्ट्रीय नामांकित संघटनेने समाधान केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली. 

या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कारमध्ये विभिन्न भूप्रदेश हाताळण्याची क्षमता आहे. ‘ऑल टेरियन व्हेईकल’ची तांत्रिक तपासणी करण्यात येऊन या कारची निर्मिती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंजाबमधील आय. आय. टी. रोपर, येथे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनीअर्स SAE-BAJA स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशातील ८२ संघांनी प्रथम फेरीतून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. यामध्ये प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी तयार करीत असलेल्या कारचे डिझाईन, अॅस्थेटीक लूक, सस्पेन्शन, इंधन कार्यक्षमता, ब्रेकिंग आदींची पाहणी, तपासणी व चाचणी घेण्यात आली. या टीमचे प्रमुख प्रशांत महाजन, उपकॅप्टन विकास प्रसाद, विरेश एखेल्ली, तुषार कच्छवे, भूषण खांदे, नितेश कुरिल, ह्रषिकेश खोजे, साईप्रसाद धनवटे, सौरभ चव्हाण, अभिषेक घुमरे, आरती आढाव, दर्शन कोठावदे, कार्तिक जहांगीर, आकाश कानडे, लालचंद अत्तरदे , मनोज वाघमारे, स्वप्नील पुलाटे या विद्यार्थांनी विभागप्रमुख प्रा. राजेंद्र खर्डे, वरिष्ट प्रा. पद्माकर काबुडके व प्रा. निलेश मनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑल टेरियन व्हेईकलची निर्मिती केली.

या कारची तांत्रिक पडताळणी (टेक्निकल इन्स्पेक्शन) नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये या व्हेईकलची विभिन्न भूप्रदेश हाताळण्याची क्षमता विशेष करून तपासण्यात आली. हे मॉडेल बनवण्यासाठी आता पर्यंत ५ लाख ३९ हजार रुपये इतका खर्च आला. या प्रोजेक्ट्च्या खर्चासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांनी आर्थिक मदत केली. यापुढेही अशा प्रकारच्या संशोधनासाठी सातत्त्याने मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राहता येथील सुप्रसिद्ध उद्योगपती सार्थक भन्साळी यांनीही या विद्यार्थांना सदर कारसाठी लागणारे विशेष प्रकारचे टायर्स व रिम्स घेण्यासाठी आर्थिक स्वरुपात मदत केली. 

प्रवरा महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. आर. आर. खर्डे, व सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र आमले, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.