Breaking News

वनविभागाचा प्रताप, बिबट्याला पकडण्यासाठी चक्क मृत शेळी!


दुर्गापूर परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याने यापूर्वी येथील बाळासाहेब पुलाटे यांच्यावर केलेला हल्ला ताजा असतांना पुन्हा एकदा एकनाथ रजपुत आणि सोमनाथ पुलाटे या दोन युवकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्याऐवजी वनविभागाने पिंज-यात चक्क मृत शेळी ठेवली. या विभागाच्या अशा ‘प्रतापा’मुळे ग्रामस्थ संतापले आहे. 

बिबट्याने केलेल्या दोन युवकांवर केलेल्या हल्ल्यात सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. दरम्यान, दुर्गापूर येथील बिरोबा मंदीर परिसरात सध्या नर-मादीसह बिबट्यांची पिल्ले आढळून आली. बिबट्याने केलेल्या हल्यानतंर वनविभागाने या भागात पिंजरा लावला. पण त्यामध्ये मृत शेळी ठेवल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंजरा लावूनही याकडे बिबट्या फिरकलाच नाही. सध्या या भागात चारा काढणे, पिकांना पाणी देणे, पिकांची काढणी आदी कामे या भागातील शेतकरी जीव मुठीत धरुन करत आहेत. मृत शेळी ठेऊन वनविभागाने त्यांचे काम केले असले तरी शेतक-यांना मात्र दररोज बिबट्याचे दर्शन घडत आहे. यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड धास्तावलेले आहेत.