Breaking News

जगायचे असेल तर स्पर्धेत धावणे अनिवार्य : कांबळे

प्रवरानगर प्रतिनिधी ;- जगात प्रचंड स्पर्धा वाढलेली असून आज प्रत्येक माणूस प्रत्येक सेकंदाला ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट घेणे आवश्यक आहे. हल्ली पावलोपावली स्पर्धा आली असून जगायचे असेल तर धावणे अनिवार्य झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक , पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषीभूषण बन्सी तांबे होते. सेंद्रिय शेतीचे सल्लागार डॉ. शंकरराव राऊत, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, कवी यशवंत पुलाटे आदी प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी कृषीभूषण बन्सी तांबे, डॉ सर्जेराव निमसे, डॉ.शंकरराव राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले. कृषी व्यवसाय व व्यवस्थापनचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोवर्धन खंडागळे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमात तीनही कृषी संलग्नित महाविद्यालयांत क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तीनही महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. रमेश जाधव यांनी आभार मानले.