Breaking News

गुढी आणि भगवे झेंडे लावून गुढीपाडवा साजरा


शहरात आज साडेतीन मुहूर्तापैकी पहिल्या मुहूर्ताला पारंपारिक पद्धतीने अनेक ठिकाणी गुढी उभारण्यात आली. मात्र शहरातील अनेक घरांवर गुढी ऐवजी भगवे झेंडे लावण्याच्या आवाहनास मोठा प्रतिसाद पहावयास मिळाला. तर काही घराच्या बाहेर मात्र गुढी व भगवा झेंडा उभारून दोन्ही बाजूशी समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने गुढी ही रामाच्या विजयापासून उभारली जाते असे ज्येष्ठ मंडळींनी सांगत गुढीची उभारणी घराघरात होताना पहावयास मिळाली. गुढी ही राजा संभाजी महाराजांच्या बलिदानाला विरोध करण्यासाठी उभारलेले कुभांड आहे. या प्रचाराचाही चांगलाच प्रभाव अनेकांवर पडल्याने ज्येष्ठ मंडळींच्या आग्रहाखातर गुढी तर युवकांच्या आग्रहाखातर घरावर भगवा झेंडा असा सुवर्ण मध्य साधला. कर्जत येथील बाजारतळ येथे काही व्यावसायिकांनी एकत्र येत 21 फुटी गुढी उभारून तिचे पूजन केले. राम ढेरे, अतुल कुलथे, राजेंद्र बारटक्के, सुनिल निंलगे आदींनी पुजन करून सार्वजनिक गुढी उभारली. आज शहरात विविध दुकाने, हॉस्पिटल व नव्याने सुरु होणार्‍या व्यवसायाची उद्घाटने झाली. तर सोने व गाड्या खरेदीचा हा मुहूर्त अनेकांनीं साधला. त्याचबरोबर मोबाईल, टीव्ही फ्रीज, कुलर व तत्सम इतर वस्तू खरेदी करून आपल्या कुटुंबीयाचा आनंद द्विगुणीत केला. यामुळे दिवसभर बाजारपेठेत वर्दळ पहावयास मिळाली.