स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांसाठी विधानभवनावर महामोर्चा
राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी आज रोजी मुंबई येथे विधानभवनावर महामोर्चा काढला जाणार असून नगर जिल्ह्यातून सुमारे 2 हजार 500 परवाना धारक स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेते या महामोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगीतले. देविदास देसाई म्हणाले की, सर्व स्वस्त धान्य दुकान परवाना धारकांना शासकिय सेवेत समाविष्ट करून शासकिय नियमानुसार वेतन देण्यात यावे, न्या. डी. पी. वधवा समितीच्या अहवालानुसार रास्त धान्य दुकान परवाना धारकांना महापालिका 56 हजार, नगरपालिका 52 हजार, ग्रामिण भागात 47 हजार 500 या प्रमाणे मासिक वेतन मिळावे, शासनाच्या नवीन धोरणानुसार हॉकर्स, किरकोळ केरोसिन, परवाना धारकांना 95 टक्के केरोसिन कोट्यात कपात केल्याने परवाना धारकांची व त्यांच्या कुटूंबियांची उपासमार होत असून उपजिविकेचे साधन संपुष्टात आले आहे. त्यामुळे, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाना धारक दुकानदारांना मानधन देण्यात यावे, या आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेवगाव तालुक्यातून जिल्हा कार्याध्यक्ष मिनाताई कळकुंबे, रज्जाक शेख, बाबा कराड, माऊली निमसे, बाजीराव बडे, पोपट पाखरे, भगवान तेलोरे, दादा उगले, शाम धूत, नारायण पाखरे, लाला शेख, राजू शिनगारे, विक्रम देशमुख, गणेश बोरूडे, रामकिसन फुंदे, विष्णू मिसाळ, राजू खटोड, आंबादास खंडागळे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते महामोर्चासाठी मुंबईकडे रविवारी रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले.