Breaking News

पशुवैद्यकांना सेवादाता नोंदणी ओळखपत्राचे वाटप


कोपरगाव ता. प्रतिनिधी- येथील खासगी कृत्रिम रेतन करणाऱ्या पशुवैद्यकांना सेवादाता नोंदणी प्रमाणपत्राचे व ओळखपत्राचे नुकतेच वाटप करण्यात आले. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कोपरगाव पंचायत समितीच्यावतीने कोपरगाव तालुक्यामध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला. पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांच्या हस्ते संबंधितांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जि. प. सदस्य राजेश परजणे, जि. प. सदस्या सोनाली रोहमारे, पंचायत समितीचे उपसभापती अनिल कदम, सदस्य मधुकरराव टेके, अर्जुनराव काळे, बाळासाहेब राहणे, वर्षा दाणे, प्रसाद साबळे आदीसंह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलतांना सभापती होन म्हणाल्या, युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. शेतकरी व खासगी कृत्रिम रेतन करणाऱ्या पशुवैद्यकांचे दैनंदिन संबंध येत असतात. पशुवैद्यकांना व्यवसाय करत असत्तांना अडचणी येऊ नये, यासाठी पशुवैद्यकांची पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय सेवा देणा-या पशुवैद्यकांना एकाच छ्ताखाली आणून शासनाच्या नियमानुसार कृत्रिम रेतन करणे बंधनकारक असणार आहे. कृत्रिम रेतन करतांना चांगल्या प्रतीच्या रेतमात्रा वापरल्या जाणार आहे.