Breaking News

काजू बीचा आयातकर सात टक्के करण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी, दि. 08 मार्च - काजू बी वरील आयात कर केंद्र शासनाने पाच टक्क्यावरुन अडीच टक्क्यांवर आणून काजू बागायतदारांची क्रूर चेष्टा केली असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार स मितीने सभापती प्रकाश राणे यांनी केला आहे. हा आयात कर वाढवून तो सात टक्के करावा, अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली असून हा अन्याय दूर न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.


आयात होणार्‍या कृषी उत्पन्नावरील आयातकर वाढवून देशातील कृषी मालाला योग्य दर मिळवून देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोकणातील काजू हे प्रमुख उत्पन्न असलेल्या या शेतमालाच्या आयातीवरील कर मात्र शासनाने पाच टक्क्यांवरुन निम्याने कमी करुन अडीच टक्क्यांवर आणला आहे.
शासनाच्या या धोरणामुळे परदेशातून येणा-या काजूला वाव दिला गेला असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. एका बाजूला कोकणातील काजू उत्पादक शेतक-याला काजू बीचा योग्य भाव मिळत नसताना परदेशातील आलेल्या काजूमुळे तो उध्वस्त होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.