Breaking News

चौपदरीकरणासाठी 25 तलावातला गाळ वापरणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 08 मार्च - महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन व मोबदल्यासंदर्भात अडीच हजार लोकांच्या हरकती आल्या आहेत. त्यामुळे 180 कोटी रुपये एवढी मोबदल्याची रक्कम वाटपा शिवाय पडून आहे. चौपदरीकरणात मातीचा भराव टाकताना जिल्हयातील तलावामधील गाळ काढून भरावात टाकला जाणार आहे. अशा 25 तलावांतील गाळ काढण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींची माहिती देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी पत्रकार परिषद घेतली. 
जिल्हाधिकारी म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला मोबदला देण्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. सिंधुदुर्गातून जाणाऱया महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन केल्यानंतर कणकवली शहर वगळता संपूर्ण महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात देण्यात आला आहे. कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना जादा मोबदला मिळावा, अशी मागणी आहे. त्या संदर्भात शासनाला अहवाल पाठविण्यात आला असून शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे. 60 जणांच्या तक्रारी प्राप्त आहेत.
महामार्ग चौपदरीकरणामध्ये भूसंपादन झालेल्या बहुतांश लोकांना मोबदला वाटपाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तरी देखील 2 हजार 500 लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने 180 कोटी रुपये वाटपाशिवाय पडून आहेत. काही लोकांचे पत्ते मिळत नाहीत, काही लोक परदेशात आहेत, तर काही लोकांचे अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे 180 कोटीची रक्कम पडून आहे. ज्या अडीच हजार लोक ांनी तक्रारी केल्या आहेत, त्या संदर्भात कणकवली व कुडाळ उपविभागीय अधिकाऱयांकडे सुनावणी सुरू आहेत. त्या ठिकाणीच तक्रारी मिटल्या, तर तात्काळ मोबदला दिला जाणार आहे. मात्र तक्रारी मिटल्या नाहीत, तर मोबदल्याची रक्कम न्यायालयाकडे जमा केली जाणार आहे व न्यायालयीन निर्णयानंतरच ती रक्कम लोकांना मिळणार आहे.
महामार्ग चौपदरीकरणसंदर्भात लोकांच्या अनेक तक्रारी असून काम करताना फुटणाऱया पाण्याच्या पाईप लाईन दुरुस्त केल्या जात नाहीत. बीएसएनएलच्या केबलही तुटल्याने सेवा विस्कळीत होत आहे. भराव टाकताना पाणी मारले जात नाही. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणच्या मुख्य अधीक्षक अभियंत्यांना कळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
महामार्गाच्या कामात भराव टाकताना तलावातील गाळ काढून टाकल्यास भरावाचे कामही होईल आणि तलाव किंवा नद्यांमधील गाळ काढला जाऊन तलाव किंवा नद्या साफ होतील. यासाठी जिल्हयातील 25 तलावांतील गाळ जलयुक्त शिवारमधून काढण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. गाळ काढल्याने पाण्याचा साठाही वाढणार आहे, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. दरम्यान लोकशाही दिनामध्ये एकूण सात तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. उचित कार्यवाहीसाठी ते त्या-त्या विभागांना पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.