ऊस उत्पादक शेतकर्यांची सर्व माहिती दर्शवणारे स्मार्ट युनिक कार्ड
सोलापूर, आपल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकर्यांची सर्व माहिती दर्शवणारे स्मार्ट युनिक कार्ड श्रीपूरच्या पांडुरंग साखर कारखान्याने काढले आहे. हे कार्ड मशीनमध्ये घालताच संबंधित शेतकर्यांचे सर्व व्यवहार दिसतात. त्यामुळे कामकाज सुलभ व गतीने होणार आहे. पेपरलेस वर्क ही संकल्पना साखर कारखानदारीत रुजवण्याचा असा प्रयोग करणारा पांडुरंग हा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना आहे. राज्यातील आदर्श साखर कारखाना म्हणून श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याकडे पाहिले जाते. नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवण्यात या कारखान्याचे पाऊल नेहमी पुढे राहिले आहे. हा कारखाना आपल्या ऊस उत्पादकांसाठी विविध योजना मोठ्या प्रमाणावर राबवतो. ऊस उत्पादकांची सर्व माहिती एकत्र दर्शवणारे स्मार्ट युनिक कार्ड काढून या कारखान्याने पेपरलेस वर्क ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या सुमारे 19 हजार ऊस उत्पादकांचे असे स्मार्ट कार्ड काढले असल्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.यासाठी बाहेरून कसलीही यंत्रणा न आणता कारखान्याचे संगणक विभागप्रमुख तानाजी भोसले यांनी हे कार्ड विकसित केल्याचे कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले. हे कार्ड विशिष्ट अशा मशीनमध्ये घातले की संबंधित ऊस उत्पादकांची सर्व माहिती दिसून येते. साखर कारखाने आपल्या ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरात साखर देतात. त्यासाठी दरवर्षी साखर कार्ड वितरीत करावे लागतात. या स्मार्ट कार्डवर साखर वितरणही होणार आहे. हे कार्ड अनेक वर्षे चालणार असल्याने साखर वितरणातील क्लिष्टता कमी होणार आहे.