Breaking News

प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायतीवर स्वाभिमानचा झेंडा

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, मार्च - सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वाभिमान पुरस्कृत कु. प्रणया मंगेश टेमकर यांनी शिवसेना पुरस्कृत ललिता पांगे यांचा 900 हुन अधिक मतांनी पराभव केला. ग्रामपंचायत सदस्यांच्या 13 पैकी 8 जागा देखील स्वाभिमान नं मिळवल्या असून शिवसेनेने 3 तर 2 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. दोन्ही अपक्षांनी स्वाभिमान मध्ये प्रवेश केल्याने स्वाभिमानची सदस्य संख्या 10 झाली आहे.


मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वाभिमान व शिवसेनेने कंबर कसली होती. स्वाभिमानच्या प्रचाराची धुरा दत्ता सामंत, अशोक सावंत, शशांक मिराशी, मंदार केणी यांनी सांभाळली तर शिवसेनेच्या प्रचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी स्वतः तळ ठोकला होता. भाजपने येथे 3 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र भाजपच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीत स्वाभिमानच्या लवू घाडी, श्रद्धा नलावडे, वैशाली कदम, पांडुरंग वायंगणकर, रेश्मा कांबळी, मंगेश टेमकर, ममता मिराशी, वृषाली आचरेकर यांनी विजय मिळवला. तर शिवसेनेचे योगेश गावकर, अनुष्का गावकर, दिव्या आचरेकर हे सदस्य विजयी झाले. राजेश पडवळ, मुजावर बशीर चावला या अपक्षांनी विजय मिळवला आहे. हे दोन्ही सदस्य स्वाभिमानच्या गोटात दाखल झाले आहेत.