Breaking News

अग्रलेख - खरी कसोटी कर्नाटकमध्ये

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकांचा बिगुल वाजला असून, 12 मे रोजी मतदान होणार असून, 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकांमध्ये खरी लढत भाजपा आणि काँगे्रसमध्ये होणार आहे. कर्नाटक राज्यांमध्ये विद्यमान सरकार काँगे्रसचे आहे, तर भाजपा देखील कर्नाटक मध्ये आपले सरकार प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असून, काँगे्रसचे एक राज्य पुन्हा खालसा करण्याच्या मनसुभ्याने या निवडणूकीत उतरले आहेत. तर दुसरीकडे काँगे्रसच्या अध्यक्षपदांचवी धुरा सांभाळत असतांनाच, कर्नाटक राज्यात काँगे्रसची सत्ता टिकविण्यासाठी राहूल गांधी संपूर्ण कर्नाटक राज्य पिंजून काढतांना दिसून येत आहे. कर्नाटकांत जर भाजपाच्या जागा वाढल्या तर राज्यसभेत देखील भाजपाच्या जागा वाढतील, त्यामुळे भाजपाला बहुमताजवळ पोहचता येईल, असा भाजपाचा कयास आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत जर भाजपाला अपयश आले, तर कदाचित मध्यावधी लोकसभा निवडणूका घेण्याची तयारी देखील भाजप करू शकते. कारण भाजपाच्या सरकारविषयी सर्वसामान्यांत नाराजी वाढत चालली असून, ही नाराजी भविष्यात उद्र्ेक करू शकते, याची कल्पना सत्ताधार्‍यांना असल्यामुळे, लवकर निवडणूका घेऊन, पुन्हा सत्ता हस्तगत करणे. म्हणजेच पुढील पाच वर्षे सत्ता टिकविता येईल असा होरा भाजपाचा आहे. तर दुसरीकडे विरोधक आक्रमक झाले असून, प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. त्यामुळे जर येणार्‍या लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करायचे असेल, तर सर्वच प्रादेशिक पक्षांसह विरोधकांनी एकवटण्याची गरज असल्याची जाणीव प्रादेशिक पक्षांसह काँगे्रसला झालेली आहे. तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांत काँगे्रसला सोबत घेण्यावरून देखील वाद आहे. कारण राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्व अद्याप अनेक प्रादेशिक पक्षांना मान्य नाही. त्यामुळे तिसरी आघाडी करून, तिसर्‍या आघाडीतील उमेदवारालाच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत करण्याकडे तिसर्‍या आघाडीचा कल असणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने कर्नाटक निवडणूक भविष्यातील बेरजेची नांदी ठरणार आहे. यात शंकाच नाही.