Breaking News

तिसर्‍या आघाडीच्या चर्चेने धरला जोर, ममतांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : राजधानीत दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी पहायला मिळत असून, चार दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर असलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची स्वतंत्र भेट घेतली.

मुख्यमंत्री बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. याकाळात त्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचादेखील समावेश आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसेत्तर प्रादेशिक पक्षाशी आघाडी उभारणे किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणे असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे नेतृत्त्व कोण करणार याचे संकेत अद्यापपर्यंत मिळाले नाहीत. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बॅनर्जी यांनी प्रादेशिक पक्षाची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांनी प्रादेशिक पक्षाची संयुक्त आघाडी स्थापनेचे संकेत दिले होते. 
ममता बॅनर्जी यांनी डीएमकेच्या नेत्या कनिमोळी, संसदेत सरकारविरुद्ध अविश्‍वास ठरावाच्या प्रस्तावाची नोटीस बजावणार्‍या वायएसआर काँग्रेस आणि बीजू जनता दलाच्या कार्यालयात जाऊन भेटी घेतल्या. एनडीए सरकारमधून बाहेर पडलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पार्टीच्या खासदारांनीही ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. टीडीपी, काँग्रेससह 9 पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर या घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान, याआधी ममता बॅनर्जी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसेत्तर प्रादेशिक पक्षाशी आघाडी उभारणे किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणे असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे नेतृत्व कोण करणार याचे संकेत अद्यापपर्यंत मिळाले नाहीत. आज होणार्‍या स्नेहभोजनातून नेतृत्वाचे संकेत देण्याचा पवारांचा प्रयत्न असेल असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी वर्तवला आहे.