Breaking News

कर्नाटकात 12 मे रोजी मतदान 15 मे रोजी होणार मतमोजणी

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुक कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला असून, 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती, मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेद्ारे दिली. पुर्ण निवडणूक ही एकाच टप्यात पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


निवडणुकीच्या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी सिद्धरामय्या सरकारसमोर भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे. भाजपचा विजयाचा वारू रोखण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात निवडणूकपूर्व प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सिद्धरामय्या सरकारवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या निवडणुकीतील आश्‍वासनांची वचनपूर्ती झाल्याचा दावा करत सत्ता स्थापनेचा विश्‍वास व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 4 कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. विशेष म्हणजे या निवडाणूकीत ईव्हिएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅडचा वापर होणार आहे. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरू आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौ़र्‍यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा रिंगणात आहेत.