Breaking News

दखल - मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करणारा नेता

सभेत उभं राहिलं, की पतंगरावांचं एक वाक्य नेहमी ठरलेलं असायचं, ते म्हणजे विश्‍वाची उत्पत्ती झाल्यापासून गावचा पहिला पदवीधर मीच. त्यात त्यांचा बडेजाव नव्हता, तर हा विश्‍वास होता सामान्य कष्टकरी पोरानं एका कष्टकर्‍याच्या मनात पेरलेला. एका शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा स्वकर्तृत्त्वानं शिक्षक होतो. 38 रुपये खिशात असताना अवघ्या विसाव्या वर्षी विद्यापीठ स्थापन करतो. त्या विद्यापीठाचा कुलपती होतो...सारं अद्भूत! पतंगरावांनी कोणत्या वर्षी भारती विद्यापीठ स्थापन केलं, हे सगळेच सांगतील; पण हे कोणी सांगणार नाही, की हा माणूस एसटीचे पैसै वाचवायला सोनसळमधून कुंडलला चालत जायचा. खूप कमी जणांना माहीत असेल एसटी चुकली, म्हणून या माणसानं विट्याच्या पाण्याच्या टाकीवर रात्र काढली होती. खूप कमी लोकं येता-जाता ती दहा बाय दहाची खोली पाहत असतील, जिथं अजूनही लिहलं आहे, ‘भारती विद्यापीठाची स्थापना येथे झाली.’

पतंगरावांच्या जाण्यानं काँग्रेस, महाराष्ट्राचं काय नुकसान होईल, याची गणितं अनेकजण मांडतील; पण सामान्य घरातला पोरगा ‘पतंगराव कदम’ होवू शकतो, हे स्वप्न असंच अजरामर राहिल! ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनंत आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातच इंग्रजी आणि गणित या विषयांची धास्ती दूर व्हावी, यासाठी कुणा तज्ज्ञाचं मार्गदर्शन लाभत नाही. हे सगळं अनुभवल्यावर आपणच एक ‘विद्यापीठ’ काढावं, ज्यात ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आकांक्षांची पूर्ती होऊ शकेल, असं स्वप्न पतंगराव क दम यांनी उरात बाळगलं. त्या वेळी त्यांचं वय होतं अवघं वीस वर्षांचं आणि खिशात होते अवघे 38 रुपये! डॉ. पतंगराव कदम यांचं मूळ गाव सोनसळ. शे-दीडशे उंबर्‍याच्या या गावात केवळ एकशिक्षकी शाळा आणि तीही चौथीपर्यंत होती. पुढील शिक्षणासाठी दहा ते 12 किलोमीटरची पायपीट रोजचीच ठरलेली. हे सारं पतंगरावांनी पार पाडलं. कशी तरी सातवीपर्यंत शाळा झाली. पुढं काय असा प्रश्‍न होता. याचवेळी कुंडलच्या वसतिगृहात राहून शिकण्याची व्यवस्था होऊ शकते ही माहिती मिळाली. घरच्यांनी तांबटकाकांच्या या वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवलं. सोनसळला वस्ती झाल्यापासून पहिला मॅट्रिक होण्याचा बहुमान पतंगरावांनी पटकावला. याचवेळी किर्लोस्करवाडीच्या एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, ‘तरुणांनी स्वतः कमवून शिकावं,’ असा संदेश दिला. मग याच संदेशानुसार ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून अर्धवेळ नोकरी करीत पतंगरावांनी पदवीचं शिक्षण घेतलं. पुण्याला पदविका मिळविली. एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी लागली; परंतु स्वप्न मोठं होतं. एकीकडं विधिशाखेचं शिक्षण पूर्ण करत असताना दुसरीकडं पीएच. डी. पदवी ही मिळविली. स्वतः च्या नावासमोर डॉक्टर लावण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आज भारती विद्यापीठाच्या देश-विदेशात 180 संस्था आहेत. 
पतंगराव बहुजनांच्या शिक्षणासाठी झटत होते. ज्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण झालं, त्याच रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे ते सदस्य झाले. खासगी विद्यापीठात आज पैशाचे व्यवहार कसे चालतात, हे सर्वांना माहीत आहे. पतंगराव एकीकडं रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि दुसरीकडं भारती विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही काम पाहत होते. 
कुणा विद्यार्थ्याचं शिक्षण पैशाअभावी अडू नये, याची काळजी ते घेतं. जे अनुभवलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी ते प्रयत्न करीत. शिक्षण कार्यासोबतच समाजक ारणाचीही त्यांना उपजत प्रेरणा होती. सांगली जिल्हा म्हणजे वसंतदादांचं प्रभुत्त्व असलेला जिल्हा. त्यांचा शब्द प्रमाण. पतंगरावांनी काँगे्रसकडं उमेदवारी मागितली; परंतु त्यांना ती मिळाली नाही. पतंगराव मुळातच बंडखोर. त्यांनी बंड केलं. अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. अवघ्या दोनशे मतांनी त्यांचा पराभव झाला. नाऊमेद न होता त्यांनी पुन्हा निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. त्यांनतर त्यांनी मागं वळून कधीच पाहिलं नाही. त्यांना काँगे्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं; परंतु महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा व्हायची, त्या प्रत्येक वेेळी त्यांना मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली. तरीही त्यांनी कधी त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही. काँगे्रसशी ते कायम एकनिष्ठ राहिले. त्यामुळं जेव्हा पतंगरावांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली, तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः लीलावती रुग्णालयात येऊन भेटून गेल्या. 
एसटी महामंडळाचे सदस्यपद मिळाल्यानंतर त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. ‘गाव तेथे एसटी’ ही संकल्पना राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. बेधडक आणि खरं ते बोलण्याचे काही तोटे होतात; मात्र पतंगरावांनी हा धोका कायम जोपासला. यामुळंच मुख्यमंत्रिपदानं अनेकदा हुलकावणी दिली, तरी जे खातं वाट्याला येई, त्यात वेगळं काहीतरी करून दाखवायची दिलदार वृत्तीही त्यांनी बाळगली होती. एरवी दुर्लक्षित असलेलं वनखातं मिळालं, तर त्याचाही फायदा सांगलीला करून दिला. देशातील सातवी वन अकादमी सुरू करण्यात त्यांचे प्रयत्न सत्कारणी लागले. त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, सहकारमंत्री, उद्योगमंत्री, वनमंत्री व महसूलमंत्रिपद भूषविलं. प्रत्येक खात्याचं काम त्यांनी ताकदीनं केलं. त्यांच्याकडं खातं कुठलंही असलं, तरी मतदारसंघात निधी आणायला ते कधी कमी पडले नाहीत. पतंगराव कदम म्हणजे कर्तृत्व आणि दातृत्व असलेलं लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. पतंगरावांच्यापुढे मदतीचा हात कुणी पसरला आणि त्याला काही मिळालं नाही असं कधीच झालं नाही. उभ्या महाराष्ट्रात शरद पवारांच्या नंतर विकासाचा डोंगर कुणी उभारला असेल, तर तो पतंगराव कदमांनीच उभारला. हे कुणालाही मान्य करावं लागेल. त्यांच्या विरोधकांनाही हे सत्य नाकारता येणार नाही. तोंड फटकळ; पण मन मोकळं असलेले पतंगराव स्टेजवरील अनेक मान्यवरांचा एकेरीच उल्लेख करत. कामाचा उरक, झपाटयानं निर्णय घेण्याची क्षमता व स्पवक्तेपणा हे त्यांचे विशेष गुण होते.