Breaking News

समाजातील महिलांचे स्थान उंचावण्यासाठी महिलांनी अधिक प्रयत्न करणे गरजेचे : श्‍वेता सिंघल


सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : समाजामध्ये महिलांना म्हणावे तेवढे स्थान नाही, हे बदलण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक दृष्ट्या सक्षम केले पाहिजे तर समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
महिलांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, पिस्तुल नेमबाज राही सरनोबत, जलतरण पट्टू स्नेहल कदम, रायफल नेमबाज रुचिरा लावंड, सिने अभिनेत्री व निर्माती श्‍वेता शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, किर्ती नलावडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मंजुषा मिसकर, रेवती शिंदे यावेळी उपस्थित होते.