Breaking News

ती ची अवस्था सध्या काय आहे.......!

नाशिक/ कुमार कडलग - ती सध्या काय करते.. हा ट्रेंड काही दिवासांपुर्वी सोशल मिडीयावर नको तितका लोकप्रिय ठरला होता. कधी गंभीरपणे तर कधी चेष्टेचा विषय म्हणून चर्चा झडत होत्या. चर्चेचा केंद्रबिंदू तीच, म्हणजे विश्‍वाच्या पाळण्याची दोरी हातात असणारी नारी. काल आणि आजही ही नारी सदा सर्वदा चेष्टेचा, हिनवण्याचा विषय. झिनकणार्‍या चुनरीया पडद्यावर करमणूक करतात तसेच त्याच एखाद्या पुरूषाला हिनवून नामर्द ठरविण्यासाठीही यथाशक्ती भुमिका बजावतात. हातात बांगड्या हे स्रीत्वाचे भुषण खरे तर.. तरीही बांगड्या भरल्या का अशा शेलकी वाक्प्रचारातून पुरूषाला नामर्द ठरविण्यासाठी स्रीत्वाच्या या अलंकाराचा वापर करण्याचा नालायकपणा शेकडो वर्षापासून आजही सुरू आहे. 

पुरूष प्रधान संस्कृतीच्या नजरेत स्री खरोखर एव्हढी कमकुवत का? आपल्या प्राचीन साहित्यापासून अगदी आजच्या पुढारलेल्या पिढीच्या हातचे खेळणे बनलेल्या सोशल मिडीयापर्यंत स्त्री विनोदाचे हत्यार बनविण्याचा नतद्रष्टपणा सुरू आहे. आपल्या संस्कृतीत किड्या मुंग्यांनाही ताठ मानाने जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले गेले पण स्त्रीला स्व इच्छेप्रमाणे जगताही येत नाही. अगदी जन्माला यायचे की नाही इथपासून या गुलामगीरीची दोरी स्त्रीच्या गळ्यात अडकवली जाते. चुकून स्त्री अपत्य या जगात अवतरले तर लग्न होईपर्यंत आई बाप भाऊ यांच्या नजरकैदेत असणारी स्त्री लग्नानंतर पतीच्या हातचे खेळणे बनते. प्रपंचाची नाव कशीतरी किनार्‍यावर आणली की वृध्दावस्थेत तिचे आयुष्य मुलाबाळांच्या हुकमाचे ताबेदार बनते.


सार्वजनिक जगातही स्रीची अवस्था या पेक्षा वेगळी नाही. पुरूष प्रधान संस्कृती बाह्य जगातही स्रीचे अस्तित्व अजूनही मान्य करायला तयार नाही.शासकीय असो नाही तर खासगी आस्थापना स्त्रीचे कर्तृत्व नाकारण्यातच पराक्रम मानला जातो. स्त्री प्रत्येक ठिकाणी हवी पण केवळ सहकारी, सहवासासाठी. पुरूष प्रधान संस्कृतीतील वखवखलेल्या नजरा स्त्री सौंदर्याचा क्षणाक्षणाला विनयभंग करण्यासाठी आसुसलेल्या असतात. अर्थात इथेही अपवाद आहेत, पण केवळ अपवादात्मक.

खरेच स्त्री एव्हढी लाचार आहे का हो? क्षणाची पत्नी अनंतकाळाची माता असे स्थान देणारी आमची पुरूष प्रधान संस्कृती कितीही पुढारलेपणाच्या सोवळ्यात वावरत असली तरी ते निव्वळ ढोंग आहे, हे समजून घेण्यासाठी वारंवार निर्भया, श्रध्दा यांचे उध्वस्त झालेले आयुष्य पुरेसे नाही का?व्याभीचार पुरूष प्रधान संस्कृतीने करायचा आणि या व्याभीचाराचे लाड पुरविण्यासाठी स्रीला कोठ्यावर बसवायचे ?
 
स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय पुरूषत्व सिध्द होत नाही म्हणून या देवीला अर्धांगीनीचे स्थान याच संस्कृतीने दिले, हेही आम्ही आपल्या सोयीप्रमाणे विसरतो. स्त्री मानवी आयुष्याची उर्जा आहे, म्हणजे शक्तीची देवता म्हणून दुर्गा, विद्येची जननी म्हणून सरस्वती, दृष्टांचा संहार करणारी अंबिका, सप्तश्रृंगी अशा नाना नामाभिधान धारण असलेली स्त्री या विश्‍वात प्रत्येक अधिकार सन्मानाची हक्कदार आहे. स्नेह प्रेम भरण पोषण यात कुठेही कंजूषी न करणार्‍या या उर्जेच्या सहवासात नर नारायण बनतो. याचाच अर्थ पुरूष प्रधान समाजाची दशा बदलून दिशा देण्याचे महातकार्य करणारे हे हात सबल आहेत. मात्र बालपणी दोरीने पाय बांधलेल्या हत्तीच्या पिलासारखी अवस्था आपण या शक्तीची केली.

स्त्री म्हणजे केवळ प्रियतमा, सखी नव्हे. इंद्रधनूच्या गोफाप्रमाणे स्त्रीत्वालाही नाना रंग असतात. ममतेचे, मातृत्वाचे, स्नेहाचे. त्यांच्या गंधाने मनुष्याचे अवघे जीवन बदलून जाते.स्त्री म्हणजे वृक्षाच्या आधारावर वाढणारी फक्त वेल नसते, तर आपल्या चपळतेनं अस्मान दणाणून सोडणारी ती विद्युल्लताही असते!!! असे कुणी तरी थोर व्यक्तीमत्वाने वर्णीत केले ते उगाच नाही, याच शक्तीची उपासना करण्याचा उदात्त हेतू जगाने नजरेसमोर ठेऊन 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्याचे निश्‍चित केले. तेंव्हापासून जगभरात तो साजरा होतो. गुरूवारीही तसा तो साजरा झाला.

ठिकठिकाणी स्रीत्वाचे गोडवे गायले गेले. प्रत्येक क्षेत्रात महिला कशी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही पुरूषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल टाकून स्रीने आपले कर्तृत्व सिध्द केल्याच्या गप्पाही आम्ही झोडल्या. खासगी आणि शासकीय निमशासकीय आस्थापना गुरूवारी पुर्ण वेळ स्त्री शक्तीच्याच ताब्यात होती. अगदी संवेदनशील मानले जाणारे पोलिस खातेही स्रीच्या ताब्यात दिले गेले. 

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. सोहळ्यातून, फोन, भ्रमणध्वनी इतकेच नाही तर नारी शक्तीचा सन्मान करणारे संदेश फेकले गेले. आणि इथेही सोशल मिडीयावर अनेक संदेशांमधून संस्कृतीतील पुरूष मात्र डोकावला. आमच्या सारख्या वाघांना जन्माला घालण्यार्‍या मातांसह आमच्या वाघासारख्या मित्रांना शेळी बनविणार्‍या वहिनीसाहेबांना महिला दिनाच्या शुभेच्छा असे संदेश व्हायरल करून आमच्या बुध्दीला चिकटलेले कोळीष्टक अजून ताजेतवाने असल्याचे दाखवून दिले... धन्य ती सोशिक नारी शक्ती.