Breaking News

बैठकांना दांड्या ग्रामपंचायात सदस्य अपात्र, जि. प. अध्यक्षा विखे यांची कारवाई


ग्रामीण भागांत विकासकामांविषयी निर्णय घेणे आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका ग्रामपंचायती बजावित असतात. मात्र या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात बैठकांना सतत अनुपस्थित राहणे भिंगारजवळील वडारवाडी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना चांगलेच महागात पडले. या सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० {९ } {ब} नुसार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याची ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये कैलास दौलत पगारे, रंजना अमोल सपकाळ, विनू संजय इस्सर, नंदकुमार नाना अहिरे आणि योगेश गोकुळ भुजबळ आदी ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कारवाईचे वृत्त सोशल मिडियावरही व्हायरल झाले. या कारवाईमुळे वडारवाडी ग्रामपंचायत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. हे ग्रामपंचायत सदस्य सलग सहा महिने वडारवाडी ग्रामपंचायतीच्या बैठकांना अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

ग्रामसंसद अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची मोठी नामी संधी असते. मात्र या अनुषंगाने होत असलेल्या बैठकांना हजर न राहता या सदस्यांनी ग्रामस्थांचा विश्वास गमावला असल्याचे यानिमित्ताने वडारवाडी परिसरात बोलले जात आहे.