Breaking News

शेतकरी मोर्चातून डोकावतोय नक्षलवाद भाजपा खासदार पूनम महाजन यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : आपल्या न्याय मागण्यांसाठी विधानभवनावर धडकलेल्या शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार पुनम महाजन यांनी केले. लाल बावटे हातात घेवून शेतकरी 200 किमीची पायपीट करत मुंबईत दाखल झाले. काही मोर्चेकर्‍यांच्या पायाला यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. अशाही स्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र या मोर्चावर भाष्य करतांना पुनम महाजन यांची जीभ घसरली, आणि त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संबध नक्षलवाद्यांशी जोडल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 


पुढे पुनम महाजन म्हणाल्या की, मला वाटतं लोकशाहीत आंदोलन करणे, आणि त्यातही जेव्हा सरकारकडून अपेक्षा जास्त असतात, तेव्हा आंदोलने होतात. ती होत आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे, उत्तर महाराष्ट्राचे शेतकरी मुंबईत आले. त्यात दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्यांनी हे मान्य केले आहे की, कर्जमाफी झाली होती गेल्यावेळी, पण येणार्‍या काळ्यात त्यांना अपेक्षा आहेत सरकारकडून. मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यावर उपायही काढले जातील. फक्त यात बघण्यासारखे आहे की, शेतकरी आले, अपेक्षा जरुर असतील, त्यांच्या हातात लाल फित होती आणि कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा होता. तर याच्यावरही चर्चा पुढच्या वेळेत करणे गरजेचे आहे, असे पूनम महाजन म्हणाल्या.
शहरी नक्षलवाद हा देशभरात जास्त वाढतो आहे. महाराष्ट्रात तर शहरी माओवादाची नवी संकल्पनाच आली आहे. ती पुण्यातून सुरु झालेली आहे. हे शिकले-सवरलेले कम्युनिस्ट विचारांची जी पिढी आहे, जी आपल्या टॅक्सवर चाळीशीत पीएचडी करते, ती या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जाऊन भरकटत आहेत. सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता उन्हातान्हातून पायी कापत शेतकरी नाशिकहून मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकर्‍यांनी पायातून येणार्‍या रक्ताची पर्वा केली नाही. अशा स्थिती लोकांना सहानुभूती देत, आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदारच माओवादाचं लेबल लावून शेतकर्‍यांची हेटाळणी करताना दिसत आहे. खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.