Breaking News

डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मान

तालुक्यातील सालवडगाव येथील सुपूत्र व मराठवाड्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार त्यांच्या हे शक्य आहे या पुस्तकास उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह मधू मंगेश कर्णिक, बाबा भांड, डॉ. सदानंद मोरे, अरुणा ढेरे आदी साहित्यिक उपस्थित होते. 

1 लाख रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सचिव, संचालक, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर त्यांनी काम केले असून सध्या ते औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांची चांदण उन्हातलं, आकांत शांतीचा, शोध मुलांच्या मनाचा, हे शक्य आहे , पुरूषार्थाला सार्थ चौथ्या स्तंभाची ही पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. शासकीय सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना शासनाकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.