Breaking News

शहरातील बंद पडलेले काम तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आदोलन

शहरातील खर्डा चौक ते अमरधाम पर्यंतचा रस्ता व खोदलेली गटारीचे बंद पडलेले काम तात्काळ सूरू करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा तपनेश्‍वर रस्त्यावरील ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जामखेड नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर यांच्यासह सबंधीतांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर राजेंद्र गोरे, ज्ञानेश्‍वर अंदुरे, मिठुलाल नवलाखा, सुरेश देशमुख, बाबासाहेब देशमाने, डॉ. प्रकाश खैरनार, डॅा. आर एम. पवार, प्रमोद पवार, डॉ. सचिन आडाले, आसिफ शेख, प्रदिप कुकरेजा यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 


या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्याच्या कडेने साधारण सहा महिण्यापुर्वी नगर परिषदेच्या वतीने गटार कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र कसलेही काम करण्यात न आल्याने या खोदलेल्या चारीत ठिकठिकाणी गटाराचे पाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. याभागात डासांची संख्या वाढल्याने आजाराला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संपुर्ण रस्त्याला अनेक ठिकाणी उपरस्ते जोडलेले आहेत. गटार खोदल्याने याठिकाणी लोकांना येता जाताना त्रास होत आहे. या रस्त्यालगत असणार्‍या लोकांना घरातून बाहेर पडतानाचा अडचणींना सामोरे जावे लागत असून अबालवृध्दांना याठिकाणी खोदलेली चारी ओलांडणे मुश्कील झाल्याने अनेकजण या चारीत पडून जखमी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 
तपनेश्‍वरचे विंचरणा नदीलगतचे अमरधाम हे शहरातील मुख्य अमरधाम असून, शहरातील 90 टक्केपेक्षा अधिक अंत्यविधी याच ठिकाणी होत असतात. यातच रस्तावरील गटार खोदल्याने या रस्त्यावरून अंत्यविधीला जाताना लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामास 1महिण्याच्या आत प्रत्यक्ष कामास सूरूवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.